"ज्यांना स्वतःच्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते..."; मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

"ज्यांना स्वतःच्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते..."; मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी या घटनेमागे दोन प्रकारच्या व्यक्ती असू शकतात, असे म्हटले.
Published on

मुंबई : दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे (शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी) यांच्या पुतळ्यावर काही अज्ञातांनी लाल रंग टाकून विटंबनेचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. हा प्रकार सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडल्याचा अंदाज असून घटनास्थळी शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी तातडीने पुतळ्याची साफसफाई केली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचे आश्वासन दिले असून सीसीटीव्हीच्या आधारे परिसरात तपास सुरू आहे.

राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरेंकडून पाहणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुपारच्या सुमारास मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. घटना नेमकी कशी घडली आणि पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली याची विचारणा राज यांनी केली. तसेच, सर्व सीसीटीव्ही तपासा आणि आरोपीला २४ तासांत अटक करा, असंही ते पोलिसांना म्हणाले. त्यानंतर, दुपारी तीनच्या सुमारास उद्धव ठाकरेही घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत पक्षाचे नेते सुभाष देसाई यांच्यासह मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांची पाहणी आणि प्रतिक्रिया

माध्यमांशी संवाद साधताना ही घटना “अत्यंत निंदनीय” असल्याचे उद्धव म्हणाले. त्यांनी यामागे दोन प्रवृत्ती असू शकतात, असे सांगितले. "आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे, हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात. यामागे अशी व्यक्ती असू शकते ज्याला स्वतःच्या आई-वडिलांचं नाव घ्यायला लाज, लज्जा, शरम वाटते...अशा कोणीतरी लावारिस माणसाने हे केलं असेल....आणि नाही तर बिहारमध्ये ज्या प्रमाणे मोदींजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला असाच कोणाचातरी महाराष्ट्र पेटवण्याचा हा उद्योग असू शकेल," असे उद्धव म्हणाले. "पोलिस या सगळ्या गोष्टींचा शोध घेतायेत, आम्ही सगळ्यांना शांत राहण्यास सांगितलं आहे. बघू पुढे काय होतं", असेही उद्धव अखेरीस म्हणाले.

घटनाक्रम

बुधवारी सकाळच्या सुमारास मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर घटनास्थळी शिवसैनिकांनी गर्दी केली. त्यांनी तातडीने आजूबाजूचा रंग पुसून स्वच्छता केली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या परिसरात खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in