

मुंबई : अभियांत्रिकी, देखभाल काम करण्यासाठी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक आहे. मुख्य मार्गावर माटुंगा-मुलुंड दरम्यान जलद मार्गांवर तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर राम मंदिर आणि बोरिवली दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक आहे.
मध्ये रेल्वे : माटुंगा ते मुलुंड
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्ग : कुर्ला - वाशी दरम्यान
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गाच्या गाड्या सकाळी १०.३४ ते दुपारी ४.३६ पर्यंत आणि पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीला जाणाऱ्या अप हार्बर मार्गाच्या गाड्या सकाळी १०.१७ ते दुपारी ४.४७ पर्यंत रद्द राहतील, तर ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील.