Mumbai : मेट्रो २-बी, ९च्या उद्घाटनाच्या विलंबामुळे प्रवाशांकडून संताप; राजकीय नेतेमंडळी निवडणुकांमध्ये व्यस्त

मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रो मार्ग २-बी आणि ९ चा पहिला टप्पा तांत्रिकदृष्ट्या संचालनासाठी तयार असूनही, तो अद्याप सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला नाही. यामुळे प्रवासी आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मेट्रो २-बी, ९च्या उद्घाटनाच्या विलंबामुळे प्रवाशांकडून संताप; राजकीय नेतेमंडळी निवडणुकांमध्ये व्यस्त
मेट्रो २-बी, ९च्या उद्घाटनाच्या विलंबामुळे प्रवाशांकडून संताप; राजकीय नेतेमंडळी निवडणुकांमध्ये व्यस्त
Published on

स्वीटी भागवत/मुंबई

मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रो मार्ग २-बी आणि ९ चा पहिला टप्पा तांत्रिकदृष्ट्या संचालनासाठी तयार असूनही, तो अद्याप सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला नाही. यामुळे प्रवासी आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या मार्गांचे उद्घाटन ३ एप्रिल रोजी होणे अपेक्षित होते, परंतु आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये ज्येष्ठ राजकीय नेते व्यस्त असल्याने हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. अद्याप उद्घाटनाची कोणतीही नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

मेट्रो मार्ग ९ च्या पहिल्या टप्प्याला ‘मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून’ अंतिम सुरक्षा मंजुरी आधीच मिळाली आहे. दहिसर (पूर्व) ते मीरा रोडमधील काशिगाव दरम्यानच्या ४.९७ किमी अंतराच्या या टप्प्याला मंजुरी मिळाली असून, हा एकूण १३.५८ किमी लांबीच्या दहिसर ते मीरा-भाईंदर कॉरिडॉरचा भाग आहे. या मार्गावर चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून प्रशासन संचालनासाठी सज्ज आहे.

लोकल गाड्यांची गर्दी आणि वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी आशा असलेल्या दैनंदिन प्रवाशांमध्ये या विलंबामुळे तीव्र नाराजी पसरली आहे.

मीरा-भाईंदर येथील प्रवासी मिताली दहीभावकर म्हणाल्या की, ‘माझे ऑफिस दहिसरला आहे. सध्या मला ट्रेन किंवा रिक्षावर अवलंबून राहावे लागते. मेट्रोमुळे प्रवास अधिक सोयीचा आणि सुखकर होईल, विशेषतः उन्हाळ्यात त्याचा मोठा फायदा होईल.

लोकांना अजूनही गर्दीच्या लोकलने प्रवास करावा लागत आहे. मार्ग तयार असूनही तो खुला केला जात नाही. प्रशासनाने औपचारिक उद्घाटनाची वाट न पाहता प्रवाशांना प्राधान्य द्यावे.

जितेंद्र सोनी, प्रवासी (चेंबूर)

तातडीने सेवा सुरू करावी- तज्ज्ञांचे मत

वाहतूक तज्ज्ञ आणि नागरिक संघटनांनीही तयार असलेल्या सार्वजनिक पायाभूत सुविधा केवळ औपचारिक सोहळ्यांसाठी रोखून धरण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जनहित लक्षात घेऊन या सेवा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मेट्रो मार्ग २-बी (मानखुर्द ते चेंबूर)

‘मेट्रो मार्ग २-बी’ चा पहिला टप्पा-मानखुर्द येथील मंडाले ते चेंबूरमधील डायमंड गार्डन दरम्यानचा ५.६ किमीचा मार्ग असून याला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच सीएमआरएसची मंजुरी मिळाली होती, मात्र अद्याप सेवा सुरू झालेली नाही. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तसेच, मेट्रो मार्ग ९ साठी कर्मचारी तैनात करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in