
स्वीटी भागवत / मुंबई :
मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो-३ (ॲक्वा लाइन) ही संपूर्ण मार्गिका या वर्षी दसऱ्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता असून आहे. या मेट्रोमुळे दक्षिण मुंबई ते उपनगरांदरम्यानचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CMRS) शुक्रवारी वरळी ते कफ परेड या अंतिम टप्प्याच्या मार्गिकेची प्राथमिक पाहणी केली.
या प्राथमिक पाहणीचा अहवाल पुढील आठवड्यात सादर होईल. त्या आधारे मंडळ पुन्हा अंतिम सुरक्षा तपासणी करणार असून, परवानग्या मिळाल्यास संपूर्ण ३३.५ कि.मी. लांबीचा कुलाबा-आरे मार्ग सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस प्रवाशांसाठी खुला होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या आरे ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या २२.४६ कि.मी. मार्गावर सेवा सुरू आहे. कफ परेडपर्यंतच्या उर्वरित टप्प्यावर एप्रिलपासून चाचणी धाव सुरू आहेत. अंतिम टप्पा पूर्ण झाल्यावर आणखी ११ स्थानके जोडली जातील आणि संपूर्ण मार्गिका कार्यरत होईल.
मेट्रो-३ सुरू झाल्यावर कुलाबा ते वरळी, सांताक्रुझ विमानतळ आणि आरे थेट जोडले जाणार आहेत. यामुळे उपनगरी रेल्वेवरील अवलंबित्व कमी होणार आहे. सध्या कुलाबा गाठण्यासाठी प्रवाशांना सीएसएमटी किंवा चर्चगेट येथे उतरून बस किंवा टॅक्सीचा वापर करावा लागतो. नवी मार्गिका मात्र थेट व सुलभ प्रवास देणार असून, मुंबईतील आतापर्यंत न जोडलेले भाग अखेर एकमेकांशी जोडले जाणार आहेत.