

मुंबई : मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गावरील प्रवास अधिक संस्मरणीय करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘पासपोर्ट स्टॅम्प बुकलेट’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या विशेष बुकलेटची विक्री आजपासून ॲक्वा लाईनवरील १० निवडक मेट्रो स्थानकांवर सुरू झाली आहे. २५० रुपये किमतीच्या या मर्यादित बुकलेटद्वारे प्रवाशांना विविध स्थानकांचे खास शिक्के गोळा करता येणार आहेत.
ॲक्वा लाइन पासपोर्ट आणि स्टॅम्प ट्रेल या उपक्रमांतर्गत हे बुकलेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुंबई मेट्रोच्या पूर्ण मार्गावरील सेवा सुरू होण्याच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त ही विशेष स्मरणिका सादर करण्यात आली आहे.
प्रवासी, पर्यटक आणि मेट्रोप्रेमींना मुंबईच्या भूमिगत मेट्रो मार्गाचा अनुभव घेण्यासोबतच प्रत्येक स्थानकाची आठवण जपण्याची संधी यामुळे मिळणार आहे.
‘स्टॅम्प ट्रेल’ पूर्ण करण्याचे आवाहन
कफ परेड, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, वरळी, सिद्धिविनायक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-२ आणि मरोळ नाका या १० स्थानकांवर पासपोर्टची विक्री सुरू करण्यात आली आहे. या पासपोर्टमध्ये पोस्टकार्डच्या धर्तीवरील आकर्षक चित्रे आणि स्थानकांचे शिक्के गोळा करण्यासाठी स्वतंत्र पाने देण्यात आली आहेत. सर्व १० स्थानकांवरील शिक्के गोळा करून ‘स्टॅम्प ट्रेल’ पूर्ण करण्याचे आवाहन एमएमआरसीने प्रवाशांना केले आहे.
बुकलेटची विक्री मर्यादित स्वरूपात
भारतात प्रथमच एखाद्या मेट्रो मार्गावर अशा प्रकारचा स्वतंत्र पासपोर्ट आणि स्थानकनिहाय शिक्के गोळा करण्याचा उपक्रम सुरू झाल्याचा दावा एमएमआरसीने केला आहे. बुकलेटची विक्री मर्यादित स्वरूपात असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ती केली जाणार आहे. या बुकलेटसाठी केवळ डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार आहे.