मेट्रो-३ प्रवासात मोबाईल वापरा बिनधास्त! आता नो नेटवर्क इश्यू; प्रवाशांना मिळणार अखंडित मोबाईल सेवा
मुंबई : लोकल रेल्वेतून प्रवास करताना महत्त्वाच्या क्षणी कॉल कट होण्याचे प्रकार अनेकांच्या बाबतीत घडले असतील. नेटवर्क प्रॉब्लेममुळे आपल्याला समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्यात अडचणी येतात. मात्र, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ च्या प्रवासात प्रवाशांना मोबाईलवर बोलता यावे, यासाठी ४-जी आणि ५-जी यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सौदी अरेबियामधील रियाध शहरात स्थित असलेल्या एसीईएस या कंपनीच्या इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीसोबत मेट्रो मार्ग-३ करिता दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. सौदी अरेबियातील रियाध शहरात आयोजित कार्यक्रमात करारावर ही स्वाक्षरी करण्यात आली.
मुंबई मेट्रो मार्ग-३ साठी दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी एसीईएस इंडिया कपंनीसोबत करार करताना आनंद होत आहे. आता मेट्रो-३ च्या प्रवासादरम्यान अखंडित मोबाईल आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होईल. एसीईएस ही जागतिक पातळीवरील अनुभव असलेली आघाडीची आंतरराष्ट्रीय न्यूट्रल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. मेट्रो-३ च्या दरवर्षी ६२५ दशलक्षहून अधिक प्रवाशांना डिजिटल अनुभव देण्यासाठीची ही भागीदारी महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.
२७ स्थानके, भूमिगत स्थानकात इंटरनेट सेवा
साधारण १२ वर्षांसाठी करण्यात आलेल्या या करारामुळे ४जी व ५जी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मेट्रो-३ द्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या ३३.५ कि.मी. लांबीच्या प्रवासादरम्यान संपूर्ण २७ स्थानकांवर, प्लॅटफॉर्मवर, भुयारी मार्गांमध्ये अतिजलद व अखंडित मोबाईल व इंटरनेट सेवा मिळणार आहे.