
कुलाबा ते सीप्झदरम्यान धावणारी मुंबईतील एकमेव मेट्रो गेल्या पाच-सहा वर्षांपासून बांधकामाच्या टप्प्यात असली तरी मुंबई मेट्रो-३ मार्गाच्या बोगद्याचे काम लवकरच पूर्णत्वास नेले जाणार आहे. बोगद्यातील ४२ पैकी ४० महत्त्वाचे टप्पे पार पडले असून मुंबई सेंट्रल मेट्रो स्टेशनवरील उर्वरित दोन टप्पे लवकरच पार पडतील, अशी आशा आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एप्रिलपर्यंत संपूर्ण प्रकल्पातील ७३.०७ टक्के काम पूर्ण केले असून आतापर्यंत ८२.०६ टक्के काम झाले आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्याकडे एमएमआरसीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असून ते म्हणाले की, “फक्त दोन किलोमीटरच्या बोगद्याचे काम शिल्लक आहे. वेळेआधीच संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण होत आहे. प्रत्येक टप्प्यातील कामे पूर्ण होण्यासाठी आम्ही योग्य रणनीती आखली असून त्यात दरवेळी सुधारणा करण्यात येत आहेत. त्याचबरोबर आम्ही सध्या सीप्झ ते वांद्रे या पहिल्या टप्प्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. बीकेसीसहित नव्याने निर्माण होणारी मेट्रो २बी आणि एअरपोर्ट रोड स्टेशनला हा मार्ग जोडणारा असल्याने तो आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.”
मेट्रो-३च्या कुलाबा ते गिरगाव स्टेशनच्या कामासाठी अद्याप दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. याविषयी विचारले असता श्रीनिवास म्हणाले की, “सुरुवातीला आम्ही सर्व स्टेशन्सच्या निर्माणावर आम्ही लक्ष केंद्रित केले होते. मात्र आम्ही सध्या पहिल्या टप्प्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. जुन्या रहिवासी इमारतींचा प्रश्न प्रलंबित असल्याने कुलाबा, गिरगाव या दोन्ही स्टेशनच्या निर्माणात अनेक अडथळे येत आहेत. मात्र हे कामही सुरू आहे.”
मरोळ मरोशीदरम्यान मेट्रोची चाचणी घेण्याचे नियोजन सुरू आहे, याविषयी श्रीनिवास म्हणाले की, “प्रस्तावित चाचणीसाठी काही झाडांची छाटणी करणे आवश्यक आहे. मात्र मेट्रो मार्ग-३मधील पहिला अथवा दुसरा टप्पा कधी पूर्ण होईल, याची आम्हाला सध्या चिंता नाही. कारण हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.” मेट्रो-३ विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते पहिल्या टप्पा (सीप्झ ते वांद्रे) डिसेंबर २०२३ किंवा जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असेही महानगर आयुक्त श्रीनिवास यांनी सांगितले.