Mumbai : मेट्रो ४ मार्गिकेच्या बीमला तडे गेल्याची तक्रार; MMRDA च्या पथकाकडून तपासणी

मुलुंड येथे मेट्रो ४ मार्गिकेवरील स्लॅब कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा मेट्रो स्थानकाजवळ मेट्रोच्या बीमला तडे गेल्याची तक्रार नागरिकांनी केली. याची दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) प्रकल्प पथकाने पाहणी केली...
Mumbai : मेट्रो ४ मार्गिकेच्या बीमला तडे गेल्याची तक्रार; MMRDA च्या पथकाकडून तपासणी
Published on

मुंबई : मुलुंड येथे मेट्रो ४ मार्गिकेवरील स्लॅब कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा मेट्रो स्थानकाजवळ मेट्रोच्या बीमला तडे गेल्याची तक्रार नागरिकांनी केली. याची दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) प्रकल्प पथकाने पाहणी केली. या पाहणीनंतर बीमला तडे गेले नसल्याचे स्पष्टीकरण एमएमआरडीएने दिले आहे.

मुलुंड दुर्घटनेनंतर संपूर्ण मार्गिकेचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होऊ लागली आहे. यातच घाटकोपर श्रेयस सिनेमा मेट्रो स्थानकाजवळ मेट्रोच्या बीम ला तडे गेल्याची तक्रार नागरिकाने केली होती. याबाबतचे फोटोही संबंधित नागरिकाने तक्रारीसोबत जोडले होते. याची दखल घेऊन एमएमआरडीएच्या पथकाने मेट्रो ४च्या श्रेयस सिनेमा मेट्रो स्थानकाजवळ दोन गर्डर्सच्या दरम्यान असलेल्या भागाची बारकाईने तपासणी केली आहे.

तक्रारदराने पाठवलेल्या दृश्यांमध्ये दिसणारी रेषा ही अतिरिक्त काँक्रीट स्लरी (बांधकामादरम्यान वापरले जाणारे सिमेंट, पाणी आणि ॲडिटिव्ह्जचे मिश्रण) असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. पथकाला तपासणीदरम्यान पृष्ठभागावर भेगा पडल्या आहेत किंवा बीमला तडे गेले आहेत असे कोठेही आढळून आले नाही. ही अतिरिक्त स्लरी काढून टाकण्यात आली आहे. बीम सुरक्षित, मजबूत आणि स्थिर आहे, असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in