
भाईंंदर : भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील डोंगरी येथील शासकीय जागेमध्ये मेट्रो कारशेड ९ उभारण्यात येणार आहे. या कारशेडमध्ये जवळपास १२ हजार ४०० झाडे तोडावी लागणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी उत्तन येथील खोपरा गावातील खासगी जमिनीवर उभारण्यात यावे, यासाठी या जमीन मालकांनी जमिनीचा योग्य मोबदला देऊन जमीन देण्यास तयारी दाखवली आहे. यासाठी जमीन मालकांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना सोमवारी प्रस्ताव दिला आहे. यामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळता येईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
मेट्रो मार्गिका क्र. ९ दहिसर ते भाईंदर काम सुरू आहे, या मेट्रोसाठी मेट्रो कारशेड हे भाईंदर पश्चिमेच्या उत्तनच्या डोंगरी परिसरातील ५९ हेक्टर शासकीय जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी निश्चित केली आहे. उत्तनच्या डोंगरी येथील शासकीय जागेत मेट्रो कारशेड स्थलांतरित केल्यामुळे त्या ठिकाणी कारशेड उभारताना सुमारे १२ हजार ४०० झाडे तोडण्यात येणार आहेत. यामुळे डोंगरी येथील स्थानिक रहिवासी तसेच पर्यावरणप्रेमींनी या कारशेडला तीव्र विरोध केला आहे. आराखड्यानुसार स्थलांतरित कारशेडची निविदा प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून पूर्ण करण्यात आली आहे. मेट्रो कारशेड अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी मुंबई येथील एमएमआरडीएच्या कार्यालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार व इतर वरिष्ठ अधिकारी, मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा, पर्यावरणप्रेमी धीरज परब, माजी नगरसेवक अजित गंडोली, बॉनी डिमेलो आदी उपस्थित होते.
...तर पर्यावरणाची हानी टळेल
मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रस्तावित मेट्रो-९ ची कारशेड मार्गिका मौजे उत्तन (खोपरा) येथे शेतकऱ्यांच्या मालकीची खासगी जमीन मिळकत १०० एकर आहे. ही जमीन १९९७ च्या विकास आराखड्यातील ४५ मीटर रुंद (१५० फूट) रस्ता, गावाच्या मागील नियोजित आराखड्यात दर्शविण्यात आलेली आहे. त्यामुळे या खासगी जमिनीवर नियोजित मेट्रो-९ कारशेड स्थलांतरित केल्यास ही मार्गिका मोर्वा गावाच्या मागे असलेल्या सरकारी खाजण जमिनीतून नेता येईल. तसेच खासगी जमीन मिळकतीत नियोजित मेट्रो-९ कारशेडचे निर्माण करतांना कोणत्याही प्रकारची वृक्षतोड अथवा पर्यावरणाची हानी होणार नाही.
योग्य मोबदला देण्यास मंजुरी
उत्तन, खोपरा येथील खासगी जमिनीवर नियोजित मेट्रो-९ कारशेड स्थलांतरित करावे व त्या जागेचा रेडीरेकनर दरानुसार योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा. या जागेचा योग्य मोबदला मिळाल्यास मेट्रो-९ कारशेडसाठी देण्यास तयार असल्याचा ठराव शेतकऱ्यांनी सर्वानुमते मंजूर करून दिला आहे.