मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आर्थिक शाश्वतता आणि पायाभूत सुविधांच्या बहुउद्देशीय वापराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. मुंबई मेट्रो लाईन २ब वर पहिल्यांदाच व्यावसायिक जाहिरात चित्रीकरण यशस्वीरीत्या पार पाडले आहे. यामुळे तिकिटाव्यतिरिक्त उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण झाला आहे. मंडाले मेट्रो स्थानक तसेच कार्यरत मेट्रो रेल्वेगाडीत हे चित्रीकरण करण्यात आले.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) च्या चित्रपट व जाहिरात चित्रीकरण अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. यामुळे मेट्रो पायाभूत सुविधा केवळ प्रवासी वाहतुकीपुरती मर्यादित न राहता अन्य मार्गाने महसूल मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमातून २०.३५ लाख इतका महसूल प्राप्त झाला आहे. एमएमआरडीएच्या नॉन-फेअर बॉक्स महसूल वाढवण्याच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळाले आहे.
भाडेआधारित उत्पन्नावरील अवलंबित्व टप्प्याटप्प्याने कमी करत आर्थिक स्थैर्य साध्य करण्याच्या दीर्घकालीन धोरणातील हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो.
मेट्रोचे चित्रपटसृष्टीला आमंत्रण
मेट्रो स्थानके आणि रेल्वेगाड्यांमध्ये चित्रीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून महसुलात सातत्याने वाढ होत आहे. आर्थिक वर्ष २०२४–२५ मध्ये २०.४१ लाख, २०२५–२६ मध्ये २५.९६ लाख आणि चालू आर्थिक वर्षात २०.३५ लाख महसूल मिळाला आहे. महामुंबई मेट्रोने निर्माते, चित्रपट दिग्दर्शक आणि कंटेंट निर्मात्यांना मेट्रोच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा वापर करण्यासाठी आमंत्रण दिले आहे.
सुलभ मंजुरी प्रक्रिया यामुळे अशा उपक्रमांची अंमलबजावणी जलद आणि सुसंगतपणे होणार असून प्रवासी सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.