आणखी दोन मेट्रो मार्ग सेवेत येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, मुंबईतील चार पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन

मेट्रोचे जाळे विस्तारत असल्याने 'मुंबई ५९ मिनिटांत' ही कल्पना साकार होत आहे. त्यानुसार येत्या सप्टेंबर महिन्यात ठाणे कापूरबावडी मेट्रो ४ मार्गाचा पहिला टप्पा, डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो २ ब मार्गाच्या पहिल्या टप्याचे उद्घाटन करण्यात येईल.
आणखी दोन मेट्रो मार्ग सेवेत येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, मुंबईतील चार पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन
Published on

मुंबई : मेट्रोचे जाळे विस्तारत असल्याने 'मुंबई ५९ मिनिटांत' ही कल्पना साकार होत आहे. त्यानुसार येत्या सप्टेंबर महिन्यात ठाणे कापूरबावडी मेट्रो ४ मार्गाचा पहिला टप्पा, डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो २ ब मार्गाच्या पहिल्या टप्याचे उद्घाटन करण्यात येईल. तर मेट्रो ९ मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नोव्हेंबर महिन्यात होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एमएमआरडीए कार्यालयात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य तसेच मुंबई उपनगराचे पालकमंत्री, ॲड. आशिष शेलार, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थितीत होते.

पूर्व आणि पश्चिम एक्सप्रेस महामार्ग यांच्यात सिग्नल विरहित जोडणी असलेला दक्षिण आशियातील पहिला १०० मीटर त्रिज्येचा तीक्ष्ण वक्रता असलेला तारांवर आधारित (केबल-स्टेड) पुलासह सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे चेंबूर ते विलेपार्ले प्रवासाचा अंदाजे १ तासाची वेळेची बचत होणार आहे. तसेच देशातील सर्वात मोठे मेट्रो प्रशिक्षण केंद्र असलेल्या एमएमटीआय मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन, कलानगर येथील उप-उड्डाणपूल (आर्म" ड") प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मेट्रो ही मुंबईची लाईफलाईन आहे. त्यामुळे रेल्वेवरील भार कमी होईल आणि मुंबईकरांना वाहतूककोंडीतून दिलासा मिळेल. कोस्टल रोडवरील मल्टी-लेव्हल उड्डाणपूल हे जागतिक दर्जाचे आहेत आणि वर्सोव्यापर्यंत पूर्ण झाल्यावर कोंडी आणखी कमी होईल.

'मुंबई ५९ मिनिटांत' संकल्पना साकार होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एमएमआरडीए मुंबईच्या जोडणीला नवा वेग देणारी कामे करत आहे. भारतातला पहिलाच तीव्र वळणाचा केबल-स्टेड पूल असलेला सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडचा शेवटचा टप्पा पूर्ण होणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांमधला प्रवास अजून सोपा होणार आहे. बीकेसीमधले सहापैकी पाच एक्झिट रूट्स तयार झालेत आणि मेट्रोचं वाढतं जाळं पंतप्रधानांनी मांडलेली 'मुंबई ५९ मिनिटांत' ही कल्पना साकार करायला तयार आहे.

कोस्टल रोड आजपासून २४ तास खुला

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्त्यावरील ५.२५ किमी लांबीच्या विहार क्षेत्र, पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले. तर शुक्रवार १५ ऑगस्टपासून मुंबईतील कोस्टल रोड नागरिकांसाठी २४ तास खुला होणार आहे. यासाठी वाहनचालकांनी कोस्टल रोडवर वाहतूक नियमांचे पालन करावे, संपूर्ण कोस्टल रोड सीसीटीव्हीच्या निरिक्षणाखाली आहे. हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारी ठरणार आहे. यात पादचाऱ्यांसाठी प्रेक्षणीय असे वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक यांचा समावेश आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in