आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये वाढ

मुंबई मेट्रो मार्गिका-३ अर्थात ॲक्वा लाइनवरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये वाढ
आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये वाढ(Photo- Salman Ansari)
Published on: 

मुंबई : मुंबई मेट्रो मार्गिका-३ अर्थात ॲक्वा लाइनवरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, २ नोव्हेंबरपासून कामकाजाच्या दिवशी ४६ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेट्रोच्या दैनंदिन फेऱ्यांची संख्या २९१ वरून ३३७ झाली आहे. विशेष म्हणजे, गर्दीच्या वेळेत दोन मेट्रो गाड्यांमधील अंतर २५ सेकंदांनी कमी करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी घटणार आहे.

आरे जेव्हीएलआर ते कफ परेडदरम्यान धावणाऱ्या मेट्रो-३ ला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एमएमआरसीने सेवांची वारंवारता वाढविण्यावर भर दिला आहे. नव्या वेळापत्रकानुसार गर्दीच्या वेळेत मेट्रो गाड्या आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी दोन गाड्यांमधील अंतर ४ मिनिटे ५० सेकंद होते. त्यामुळे स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यासह प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

प्रवाशांना दिलासा

मेट्रो-३ चा संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला झाल्यानंतर सुरुवातीला दररोज २७१ फेऱ्या चालविण्यात येत होत्या. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने २३ जून २०२६ रोजी फेऱ्यांची संख्या २८२ करण्यात आली. त्यानंतर २८ सप्टेंबरला आणखी वाढ करून २९१ फेऱ्या सुरू करण्यात आल्या. आता त्यात ४६ फेऱ्यांची भर पडल्याने कामकाजाच्या दिवशी एकूण ३३७ फेऱ्या धावणार आहेत. दरम्यान, शनिवार आणि रविवारच्या दिवशी मेट्रोची सेवा स्वतंत्र सप्ताहअखेरच्या वेळापत्रकानुसारच सुरू राहणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातही फेऱ्यांच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात येतील, असे एमएमआरसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)