

भाईंंदर : दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गिका क्रमांक ९ वरील मेडतिया नगर स्थानक परिसरात सोमवारी सकाळी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बांधकाम साहित्य हलविण्याचे काम सुरू असताना सुरक्षेचा गंभीर प्रकार घडला. क्रेनच्या सहाय्याने साहित्य हलविताना ते वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बास्केटचा पादचारी पूल परिसरात ठेवलेल्या ग्रॅनाइटच्या दगडांना धक्का लागला. त्यामुळे काही दगड बॅरिकेडिंग केलेल्या कार्यक्षेत्राबाहेरही पडले. या घटनेनंतर परिसरातून जाणाऱ्या वाहनाचा टायर ग्रॅनाइटच्या धारदार तुकड्यांमुळे पंक्चर झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
या सुरक्षाविषयक त्रुटीची गंभीर दखल घेत एमएमआरडीएने संबंधित तीन यंत्रणांवर एकूण १२.५० कोटींची कारवाई केली. मेट्रो प्रकल्पाचे मुख्य कंत्राटदार जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड यांच्यावर १० कोटी रुपये, आर्किटेक्चरल फिनिशिंग कंत्राटदार एन. ए. गजानन यांच्यावर १.५० कोटी रुपये, तर प्रकल्पाचे जनरल कन्सल्टंट सिस्ट्रा-सीईजी यांच्यावर १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
दरम्यान, या घटनेनंतर काही माध्यमांमध्ये स्कूल बस किंवा व्हॅनवर ग्रॅनाइटचे दगड पडल्याचे वृत्त प्रसारित झाले. मात्र, या घटनेत कोणताही ग्रॅनाइटचा दगड स्कूल बस किंवा व्हॅनवर पडलेला नाही तसेच संबंधित वाहनाला दगडाची थेट धडक झालेली नाही, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.
दंडानंतरही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
संबंधित कंत्राटदार आणि सल्लागारांवर यापूर्वीही सुरक्षाविषयक त्रुटी आणि निष्काळजीपणाच्या प्रकरणांत दंडात्मक कारवाई झाल्याचे समोर आले आहे. कामातील हयगय आणि निष्काळजीपणामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याप्रकरणी जे. कुमार यांच्या कामाच्या ठिकाणी गरम डांबर पडून कामगार जखमी झाल्याच्या घटनेत ५० लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता. तसेच गरम डांबरामुळे दुचाकीस्वार गंभीररीत्या भाजल्याच्या घटनेप्रकरणीही कारवाई करण्यात आली होती. याशिवाय, मेट्रो सल्लागार सिस्ट्रा-सिईजी-सिस्ट्रा यांच्यावरही एका प्रकरणात ५ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. जॅक कोसळणे तसेच कामगाराचा पडून मृत्यू होणे अशा घटनांमध्येही संबंधितांवर कोट्यवधी रुपयांची दंडात्मक कारवाई झाल्याचे सांगण्यात येते.