

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई मेट्रो लाईन ६ मध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जोगेश्वरी येथे पश्चिम रेल्वे मार्गावर दुसरा स्टील कॉम्पोझिट गर्डर स्पॅन यशस्वीरीत्या उभारण्यात आला आहे. एमएमआरडीएने हे काम केवळ १ तास ३५ मिनिटांत पूर्ण केले आहे. या कामाच्या पूर्णत्वामुळे मेट्रो लाईन ६ च्या एकूण काम ८८ टक्क्यांहून अधिक झाले आहे.
या रेल्वे स्पॅनचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेला ३ तास १० मिनिटांच्या ट्रॅफिक ब्लॉक घ्यावा लागेल असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र एमएमआरडीएने ते केवळ एक तास ३५ मिनिटांत पूर्ण केले आहे. या नव्या स्पॅनची लांबी ३१.१६ मीटर असून वजन सुमारे ९० मेट्रिक टन आहे. या संरचनेत स्टील कॉम्पोझिट गर्डर्स, डायफ्राम्स आणि ब्रेसींग सिस्टीमचा समावेश असून, दीर्घकालीन मजबुती आणि सुरक्षितता लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे.
या संपूर्ण कामात ओव्हरहेड इक्विपमेंट बंद करणे, वायर खाली घेणे, क्रेनची उभारणी, जड स्पॅन उचलणे, अचूक बसविणे, स्ट्रक्चरल फिक्सिंग, तपासणी आणि रेल्वे व्यवस्था पुन्हा सुरू करणे अशा अनेक गुंतागुंतीच्या टप्यांचा समावेश होता. हे सर्व काम अत्यंत मर्यादित वेळेत आणि अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले. या कामासाठी ५०० टन आणि ६०० टन क्षमतेच्या हायड्रॉलिक क्रेन्सचा एकत्रित वापर करण्यात आला. ज्यामुळे कार्यरत रेल्वे मार्गावर स्पॅन अचूकपणे उभारणे शक्य झाले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी एमएमआरडीए, कंत्राटदार आणि पश्चिम रेल्वे यांच्यात मिनिटागणिक समन्वय साधावा लागला.
रेल्वे मार्गावर सलग दोन स्टील स्पॅन यशस्वीरीत्या उभारण्यात आल्यानंतर, मेट्रो लाईन ६ मधील सर्वात महत्त्वाच्या अभियांत्रिकी आव्हानांपैकी एक टप्पा पूर्ण करण्यात एमएमआरडीएला मोठे यश मिळाले आहे. ही मार्गिका कार्यरत झाल्यानंतर स्वामी समर्थ नगर (अंधेरी लोखंडवाला) ते विक्रोळी दरम्यान धावणारी मेट्रो लाईन ६ मुंबईतील पूर्व-पश्चिम दळणवळण मोठ्या प्रमाणात सुधारून प्रवासाचा वेळ कमी होईल.
मेट्रो लाईन ६ प्रकल्पाचा वेग आता लक्षणीय वाढला असून, ८८ टक्के टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, अत्यंत गुंतागुंतीची अभियांत्रिकी कामे ज्या वेगाने आणि अचूकतेने पूर्ण केली जात आहेत, ते कौतुकास्पद आहे. ३ तासांपेक्षा अधिक कालावधीचा नियोजित ब्लॉक असताना अवघ्या १ तास ३५ मिनिटांत रेल्वे स्पॅन पूर्ण करणे हे आमच्या टीमच्या नियोजन क्षमतेचे, समन्वयाचे आणि तांत्रिक कौशल्याचे प्रतीक आहे.
डॉ. संजय मुखर्जी, एमएमआरडीए आयुक्त