

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात १०० किलोमीटरपेक्षा अधिक मेट्रो सुरू झाली आहे. त्यामुळे देशात प्रवासी सेवेत असलेल्या मेट्रोमध्ये दिल्लीनंतर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. येत्या काही वर्षात मेट्रोचे अनेक प्रकल्प पूर्ण होणार आहेत. त्यामुळे ३ ते ४ वर्षांत दिल्लीपेक्षा अधिक नेटवर्क सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मेट्रो ९, आणि मेट्रो २बी च्या पहिल्या टप्प्याचे मंगळवारी लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, या प्रकल्पामुळे प्रवास केवळ ३० मिनिटांत पूर्ण होईल. हा मार्ग सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि एलईडी लाईटिंगमुळे ‘हरित प्रकल्प’ म्हणून ओळखला जाईल.
या ४.७ किलोमीटरच्या मार्गावर दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव ही चार स्थानके प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली आहेत. मुंबई व मुंबई महानगर प्रदेशात एकूण ३३७ किमी मेट्रो नेटवर्क उभारण्याचे उद्दिष्ट असून, पूर्ण झाल्यानंतर दररोज सुमारे ७० लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करू शकतील. या कार्यक्रमानंतर मेट्रो २ बी च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आणि पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मेट्रो २बी ही पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मुंबईला जोडणारी महत्त्वाची लाइन असून, हार्बर लाइनवरून प्रथमच मेट्रोला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
सुमारे १०,९८६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातील पहिला टप्पा ३,२२५ कोटी रुपयांचा असून, मंडाले डेपो हा या प्रकल्पाचा कणा ठरणार आहे. सुमारे ३०.४५ हेक्टर क्षेत्रावर उभारला जाणारा हा डेपो देशातील सर्वात मोठा मेट्रो डेपो असेल.
दुबई, लंडनच्या धर्तीवर पॉड टॅक्सी : मुंबईची नवी ओळख
बीकेसी परिसरात ‘पॉड टॅक्सी’ या नावीन्यपूर्ण प्रकल्पाचे ई-भूमिपूजन पार पडले. हा प्रकल्प दुबई आणि लंडनमधील सुविधांच्या धर्तीवर उभारला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३.३६ किमीमध्ये ८ स्थानके, चालकरहित वातानुकूलित पॉड प्रणाली, प्रत्येक पॉडमध्ये ६ प्रवासी, सार्वजिनक खासगी तत्त्वावर उभारणी, शून्य कार्बन उत्सर्जन प्रवास असणार आहे.
महापौरांना गेटवरच रोखले
मुंबईच्या महापौर रितू तावडे या मेट्रो ९ मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कार्यक्रम स्थळी जात असताना त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले. महापौरांना अडविण्यात असल्याने लोकप्रतिनिधींनी पोलिसांसोबत वाद घातला. यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी काही वेळ ताणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गेटवरच रोखण्यात आल्याने महापौरांची नाराजी दिसून आली. वादानंतर अखेर त्यांना कार्यकर्त्यांसोबत गेटमधून आत जाण्यास पोलिसांनी परवानगी दिली.