

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) १४ फेब्रुवारी ते १७ ऑक्टोबर दरम्यान मेट्रो प्रकल्पांच्या तीन वेगवेगळ्या ठिकाणांवर सात अपघात घडल्याचे समोर आले आहे. यामुळे बांधकाम स्थळांवरील सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली असून याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठाने एमएमआरडीएला हे सर्व सात अपघात आणि मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी घेतलेल्या सुरक्षा उपायांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
एमएमआरडीए प्रतिज्ञापत्र दाखल करणार
मेट्रोच्या कामा सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वारंवार घडणाऱ्या या अपघातांची न्यायालयाने गंभीर दखल घ्यावी, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले. एमएमआरडीएकडून बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले की, प्राधिकरण या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून याचिकाकर्त्यांनी नमूद केलेल्या घटनांबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केले जाईल.
सर्व मेट्रो कॉरिडॉरच्या सुरक्षा ऑडिट करण्याची विनंती
अदालतीने प्राधिकरणाला उत्तर दाखल करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ दिला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला निश्चित केली आहे. वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ कॉरिडॉरच्या बांधकामादरम्यान १४ फेब्रुवारी रोजी एलबीएस मार्ग, मुलुंड येथे झालेल्या अपघातानंतर ठक्कर यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. मेट्रोच्या खांबावरील सुमारे २.५ मेट्रिक टन वजनाचा काँक्रीट पॅरापेट कोसळल्याने हा अपघात झाला होता. मुलुंडच्या या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व मेट्रो कॉरिडॉरच्या सुरक्षा ऑडिटचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.
मुलुंडमधील अपघाताला कंत्राटदार जबाबदार
मुलुंडमधील अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या एमएमआरडीएच्या चौकशी समितीने आरएजेव्ही कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरले होते. डिझाईन किंवा साहित्यामध्ये कोणतीही त्रुटी नसून पॅरापेटला आधार देणारे तात्पुरते सपोर्ट काढून घेतल्यामुळेच हा अपघात घडल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.
आनंदनगर-साकेत उन्नत अपघाताचा विशेष उल्लेख
यावेळी त्यांनी १७ ऑक्टोबर रोजी ठाणे-मुंबई प्रवेशद्वारानजीक असलेल्या आनंदनगर-साकेत उन्नत मार्गावर (इलेव्हेटेड कॉरिडॉर) घडलेल्या अपघाताचा विशेष उल्लेख केला. या दुर्घटनेत लोखंडी मजबुतीकरणाची स्ट्रक्चरल फ्रेम चालत्या कारवर कोसळली. या भीषण अपघातात कारमधील महिला प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.