

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत उभारण्यात येत असलेल्या मुंबई मेट्रो लाईन-१२ (कल्याण ते तळोजा) या प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. 'शिळफाटा रोडवरील डोंबिवली MIDC मेट्रो स्टेशनजवळ १०० वा U-गर्डर यशस्वीरीत्या लाँच करण्यात आला असून प्रकल्पाच्या बांधकामात हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. यामुळे प्रकल्पाला आणखी वेग मिळणार आहे', असे एमएमआरडीएने सांगितले.
१९ स्थानके, २३.५७ किमी लांबीचा ‘ग्रीन मोबिलिटी’ कॉरिडॉर
'शतकाचा टप्पा पार.. ऑरेंज लाईनवरील कामकाज वेग पकडत आहे', अशी सोशल मीडिया पोस्ट करीत एमएमआरडीएने या प्रकल्पाबाबतची महत्त्वाची माहिती दिली आहे. संपूर्णपणे उन्नत (Elevated) असलेली ही ऑरेंज लाईन सुमारे २३.५७ किलोमीटर लांबीची असून कल्याण, डोंबिवली आणि तळोजा मार्गे पुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी हरित, अखंड आणि जलद पद्धतीनं जोडली जाणार आहे. या मार्गावर एकूण १९ स्थानकांची योजना असून, या मेट्रोमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच कळवा–तळोजा पट्ट्यात ट्रान्झिट-ओरिएंटेड विकासाला चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम प्रवासाचा पर्याय म्हणून ही लाईन महत्त्वाची ठरणार आहे.
२१ ते २३ मीटर उंचीवर मेट्रो स्थानके
कळवा–शिलफाटा–तळोजा मार्गाच्या समांतर धावणाऱ्या या कॉरिडॉरमध्ये ७ किलोमीटर लांबीचा MSRDC फ्लायओव्हरही समाविष्ट आहे. या प्रकल्पात अनेक अभियांत्रिकी आव्हानात्मक रचना करण्यात येत आहेत. कोळेगाव परिसरात १०० मीटरचा मोकळा स्पॅन, तळोजा रेल्वे उड्डाणपुलाजवळ ७५ मीटरची स्टील संरचना, तसेच महत्त्वाच्या रेल्वे व रस्त्यांवरील क्रॉसिंग्ज यांचा यात समावेश आहे. २१ ते २३ मीटर उंचीवर उभारण्यात येणारी मेट्रो स्थानके प्रवाशांसाठी सुलभ प्रवेशाच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आली आहेत.
थेट मध्य रेल्वे नेटवर्कशी जोडणार; इंटरचेंज कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास सुलभ
मेट्रो लाईन-१२ सुरू झाल्यानंतर महत्त्वपूर्ण इंटरचेंज सुविधांद्वारे प्रवासी खालील मार्गांशी सहज जोडले जातील. कळवा येथे मेट्रो लाईन ५, हेडूतने येथे मेट्रो लाईन १४, अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो लाईन १ तसेच कळवा जंक्शनला थेट फूट ओव्हर ब्रिज (FOB) द्वारे मध्य रेल्वेशी जोडलं जाणार आहे.
कधी पूर्ण होणार प्रकल्प?
हा प्रकल्प मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे, असे एमएमआरडीएने सांगितले.
आजपर्यंतची प्रगती :
कल्याण - मानपाडा सर्व्हे व अलाइनमेंट पूर्ण.
पहिला पाईल, पियर कॅप आणि U - गर्डर यशस्वीरीत्या कास्ट आणि उभारणी.
पूर्ण क्षमतेसाठी बॅचिंग प्लांट सुरू.
प्रमुख भागांवर नागरी कामं आणि पियर बांधकाम वेगानं सुरू.
पत्रीपूल व अमनदूत परिसरात भूमी संपादन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू.