

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता महापौर निवड आणि स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवकांच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा आठ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारलेल्या एमआयएम पक्षाची महापालिकेतील ताकद आणखी वाढणार आहे. संख्याबळानुसार एमएमआय पक्षाला एक स्वीकृत नगरसेवक सभागृहात पाठवण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई महापालिकेत एकूण १० स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवक नियुक्त केले जाणार आहेत. या जागांचे वाटप राजकीय पक्षांच्या निवडणूक निकालातील संख्याबळानुसार केले जाते. बहुमत मिळालेल्या भाजपला सर्वाधिक चार स्वीकृत नगरसेवक नेमता येणार असून शिवसेना (ठाकरे) पक्षाला तीन, शिवसेना (शिंदे) पक्षाला एक, काँग्रेसला एक, तर आठ नगरसेवक निवडून आणलेल्या एमआयएमलाही एक स्वीकृत जागा मिळणार आहे.
स्वीकृत जागांची संख्या मयादित
महापालिका निवडणूक नुकतीच पार पडली असून, स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय पक्षांमध्ये आणि इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. थोड्या फरकाने पराभूत झालेले उमेदवार, उमेदवारी नाकारले गेलेले, तसेच पक्षांतर केलेले इच्छुक स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, स्वीकृत जागांची संख्या मर्यादित असल्याने सर्वांना संधी मिळणे शक्य नाही.
पूर्वी मुंबई महापालिकेत २२७प्रभागांतून २२७ नगरसेवक निवडून येत होते आणि केवळ पाच नामनिर्देशित नगरसेवक असायचे. यंदा मात्र नियमांनुसार १० स्वीकृत नगरसेवक नियुक्त केले जाणार आहेत.
असा आहे नियम ?
मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम ५ (१) (ब) नुसार १० नामनिर्देशित सदस्यांची तरतूद आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ (२) (ब) नुसार एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के किंवा १० सदस्य-यापैकी जे कमी असेल तेवढेच स्वीकृत नगरसेवक नेमता येतात. या नियुक्त्या सभागृहाच्या संमतीने केल्या जातात आणि सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला अधिक स्वीकृत जागा मिळतात. त्यानुसार आता स्वीकृत नगरसेवक नेमले जाणार आहेत.
नगरसेवकांचे असे असणार प्रमाण
भाजप - ४
शिवसेना (ठाकरे) - ३
शिवसेना (शिंदे) - १
काँग्रेस - १
एमआयएम - १