मुंबईतील आमदारांत उत्कृष्ट कामगिरीत अमीन पटेल अव्वल; नवाब मलिक तळाशी
मुंबई : मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचे प्रगतीपुस्तक प्रजा फाऊंडेशन या संस्थेने मंगळवारी जाहीर केले. उत्कृष्ट कामगिरीत काँग्रेसचे अमीन पटेल हे प्रथम, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुनील प्रभू द्वितीय क्रमांकावर, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड तृतीय क्रमांकावर, भाजपच्या मनिषा चौधरी चौथ्या क्रमांकावर आणि काँग्रेसचे अस्लम शेख पाचव्या स्थानी आहेत.
कामगिरीच्या यादीत तळाशी असलेल्या पाच आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे नवाब मलिक ( १८ टक्के ), शिवसेनेचे ( शिंदे ) सदा सरवणकर (२७.२७ टक्के), शिवसेनेचे ( शिंदे) प्रकाश सुर्वे ( २९.८२ टक्के), शिवसेनेचे ( शिंदे ) दिलीप लांडे (३१.२६ टक्के) आणि भाजपचे राम कदम (३३.०७ टक्के) यांचा समावेश करण्यात आला आहे. २०२४ मध्ये मुंबईतील ३४ पैकी केवळ एका आमदाराने ८० टक्क्यांच्या वर गुण मिळविले आहेत. यात आमदारांची विधानसभेतील संसदीय कामगिरी लक्षात घेतली आहे. त्यांच्या मतदार संघातील नागरिकांकडून मात्र कोणताही अहवाल घेण्यात आलेला नाही. अमीन पटेल - ८२.९२ टक्के, सुनील प्रभू - ७८.७१ टक्के, तर वर्षा गायकवाड - ७६.५१ टक्के यांनी संवैधानिक जबाबदाऱ्यांचे भान ठेवत नागरी प्रश्नांना वाचा फोडली, असे संस्थेने म्हटले आहे.
काँग्रेस पहिल्या स्थानी
आमदारांच्या कामगिरीवरून त्यांच्याशी संबंधित राजकीय पक्षांच्या कामगिरीचा विचार केला, तर काँग्रेसने सर्वाधिक ७२.५६ टक्के मिळवत पहिले स्थान पटकावले. तर, ६०.०८ टक्के मिळवून भाजप दुसऱ्या क्रमाकांवर आहे.