

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला ( एमएमआरडीए) अखेर जाग आली आहे. गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी ही बिकेसीमधील एक गंभीर समस्या झाली आहे. यावर उपाय म्हणून रस्ता रुंदीकरण आणि एकेरी वाहतूक व्यवस्था असे पर्याय राबविण्यात येणार आहेत. सायकल ट्रॅक काढून रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मुंबईतील एक प्रमुख व्यावसायिक आणि आर्थिक केंद्र आहे. आर्थिक घडामोडींचे हे महत्त्वाचे केंद्र सतत विकसित होत आहे. बिकेसीमध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येथे दररोज सुमारे २ लाख कर्मचारी आणि ४ लाखांहून अधिक अभ्यागत येतात. गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी ही येथील एक गंभीर समस्या झाली आहे. सायन पूल बंद असल्यामुळे बहुतांश वाहतूक वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात वळवण्यात आली आहे. बीकेसी मार्ग हे प्रामुख्याने लहान वाहनांसाठी असल्याने सध्या ट्रक तसेच अवजड वाहने व मालवाहतूक वाहनांचा प्रवास या मार्गावरून होत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी एमएमआरडीएने तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचे एमएमआरडीएने ठरविले आहे.
बिकेसीमधील ववाहतूक समस्या हाताळण्यासाठी प्राधिकरणाच्या टीमने एक विस्तृत वाहतूक व्यवस्थापन योजना तयार केली आहे. सध्याच्या आणि भविष्यातील संभाव्य वाढीची शक्यता, प्रवाशांची वाढती संख्या, सध्या सुरू असलेली पायाभूत सुविधा विकासकामे आणि भागधारकांच्या अभिप्रायांचे सखोल विश्लेषण करून ही योजना तयार करण्यात आली आहे.
बीकेसी हे सार्वजनिक परिवहन सुविधांच्या माध्यमातून उत्तम प्रकारे जोडले गेले असले, तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. विशेषत: वांद्रे-कुर्ला लिंक रोडवर कलानगर जंक्शनपासून भारत डायमंड बोर्सपर्यंत वाहतूक कोंडी होते. शीव उड्डाणपुलाचे पुनर्निर्माण, इत्यादी पायाभूत विकासकामांमुळे येथील वाहतुकीची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
बीकेसीसाठी एमएमआरडीएने तयार केलेल्या तपशीलवार वाहतूक व्यवस्थापन योजनेला प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरण बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई वाहतूक पोलिस विभागाच्या सहयोगाने तयार केलेली ही योजना ही दीर्घकालीन वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे.
सायकल ट्रॅक हटवणार
या उपक्रमाचा भाग म्हणून सायकल ट्रॅक काढून रस्त्याचे रुंदीकरण २+२ लेन वरून ३+३ लेन करण्यात येईल – म्हणजेच रस्ता रुंदीकरणात सुमारे ५०% वाढ होणार आहे. परिणामी, गर्दीच्या वेळेतील प्रवासाचा कालावधी २५ मिनिटांवरून १५ मिनिटांपर्यंत कमी होईल या १० मिनिटांमुळे प्रवासी वेळेत ४० टक्के बचत होणार आहे.
सायकल ट्रॅकवरील खर्च पाण्यात
बीकेसीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून सायकल ट्रॅक तयार करण्यात आला होता. परंतु याचा उपयोग न झाल्याने अखेर यासाठी खर्च करण्यात आलेला खर्च पाण्यात गेला आहे. ट्रॅकमुळे रस्ते अरुंद झाल्याने अखेर सायकल ट्रॅक मार्गिकेत रूपांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढेल. परिणामी, प्रत्येक मार्गिकेची वाहतूक क्षमता ६००–९०० वाहनांनी वाढेल अशी अपेक्षा आहे. रस्त्यावरील दिवे, साइनबोर्ड, झाडे, बस थांबे आणि सुशोभीकरणासाठी लावलेले घटक पदपथावर हलविण्यात येतील. त्यामुळेही रस्त्याची रुंदी वाढण्यास मदत होईल.
एकेरी वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी होणार
वाहनांचे अंतर्गत दळणवळण सुरळीत करण्यासाठी बीकेसीमधील सर्वात व्यस्त भागातील कोंडी कमी करण्यासाठी बीकेसी भागात एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात येईल. तज्ज्ञांच्या शिफारसी व वाहतुकीचा अभ्यास यांच्याआधारे ही उपाययोजना राबविल्याने वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल.