अटल सेतूवरील मेगा दुरुस्तीला सुरुवात; दर्जा व टिकाऊपणा राखण्यासाठी MMRDA चा मोठा निर्णय

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’वर पृष्ठभाग नूतनीकरण आणि पेव्हमेंट पुनर्बांधणीची मोठी कामे हाती घेतली आहेत. सेतूची दीर्घकालीन मजबुती कायम राहावी आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी अनुभव मिळावा यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
अटल सेतूवरील मेगा दुरुस्तीला सुरुवात; दर्जा व टिकाऊपणा राखण्यासाठी MMRDA चा मोठा निर्णय
अटल सेतूवरील मेगा दुरुस्तीला सुरुवात; दर्जा व टिकाऊपणा राखण्यासाठी MMRDA चा मोठा निर्णयPhoto : X (@MMRDAOfficial)
Published on

उरण : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’वर पृष्ठभाग नूतनीकरण आणि पेव्हमेंट पुनर्बांधणीची मोठी कामे हाती घेतली आहेत. सेतूची दीर्घकालीन मजबुती कायम राहावी आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी अनुभव मिळावा यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या उपक्रमामुळे सेतूची जागतिक दर्जाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा कायम राखण्यास मदत होणार आहे.

कामादरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद न करता, दुरुस्ती टप्प्याटप्प्याने केली जात आहे. पहिल्या टप्प्यात तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांवर (लेन्सवर) पृष्ठभाग पुनर्बांधणीची कामे सुरू आहेत. त्यानंतर उर्वरित दोन मार्गिकांवर काम करण्यात येईल. नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील बाहेरील मार्गिकांमध्ये विशेषतः अवजड वाहनांसाठी असलेल्या ठिकाणी पृष्ठभागाची झीज आढळून आल्यानंतर एमएमआरडीएने सखोल तांत्रिक तपासणी केली होती.

पावसाळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मास्टिक ॲस्फाल्टचा वापर करून तात्पुरती दुरुस्ती आधीच करण्यात आली होती. आता पावसाळा संपल्यानंतर पूर्ण क्षमतेने पृष्ठभाग नूतनीकरणाच्या कायमस्वरूपी कामांना सुरुवात झाली आहे.

दुरुस्तीच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, म्हणून एमएमआरडीए विशेष दक्षता घेत आहे.

एमएमआरडीएचा विश्वास

प्रकल्पासाठी वापरले जाणारे साहित्य, मिश्रण रचना आणि जागेवरील कामकाज यांची पडताळणी आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. प्रकल्प अद्याप ‘दोषदायित्व कालावधी’त असल्यामुळे संपूर्ण नूतनीकरणाचा खर्च संबंधित कंत्राटदाराकडूनच उचलला जाणार आहे. या कामांमुळे देशातील सर्वात लांब सागरी सेतूवर प्रवास अधिक सुरक्षित, अखंड आणि सुखकर होईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in