

मुंबई : ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मंगळवारी मोहम्मद अली रोडवरील फुटपाथ ‘अतिक्रमणमुक्त’ची कारवाई करण्यात आली. या कारवाईत बेकायदा स्टॉल्स आणि बांधकामे, दुकानांवर हातोडा मारण्यात आला. ‘बी’ वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
मोहम्मद अली रोड परिसरातील तीन दुकाने, स्टॉल्स हटविण्यात आले. याशिवाय अन्य बेकायदा बांधकामे, दुकानांसमोरील अनधिकृत प्रोजेक्शन्स, ताडपत्री शेड्स तसेच रस्त्यावर व फुटपाथवर अडथळा निर्माण करणारे विविध साहित्य हटविण्यात आले. या कारवाईत देखभाल विभागाचे सहाय्यक अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक अभियंता तसेच परवाना व अतिक्रमण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
मुंबईकर पादचाऱ्यांना पदपथावरून चालणे सुरक्षित व सुलभ व्हावे यासाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुंबईतील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मंगळवारी बी वार्डातील मोहम्मद अली रोडच्या फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
नागरिकांकडून आनंद व्यक्त
दरम्यान, अतिक्रमण मुक्त फुटपाथ ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार, असा इशारा ‘बी’ वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांनी दिला आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मुक्त फुटपाथ ही कारवाई सुरू असून या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत करत पादचाऱ्यांना सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी अशा मोहिमा नियमितपणे राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.