मुंबईकरांना खुशखबर! यंदा पावसाचे लवकर आगमन

वरुणराजा आग ओकू लागला असतानाच, काही शहरांत उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच तापमानाने चाळीशी कधीच ओलांडली असून नागरिकांना प्रचंड उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबईकरांना खुशखबर! यंदा पावसाचे लवकर आगमन
Published on

मुंबई : वरुणराजा आग ओकू लागला असतानाच, काही शहरांत उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच तापमानाने चाळीशी कधीच ओलांडली असून नागरिकांना प्रचंड उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, मुंबईकरांची या उकाड्यातून यंदा लवकर सुटका होणार आहे. मुंबईत यंदा ८ ते ११ जूनदरम्यान पाऊसधारा बरसतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईमध्ये दरवर्षी मान्सूनला १० जूननंतर सुरुवात होते. पण यंदा हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ८ ते ११ जूनदरम्यान पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या ८ ते १२ जूनदरम्यान पाऊस सुरू होईल, असा ९२ टक्के अंदाज आहे. गेल्यावर्षी मोसमी पाऊस ९ जून रोजी मुंबईत दाखल झाला होता, तर २०२० मध्ये १४ जून रोजी पावसाचे आगमन झाले होते. २०२३ मध्ये उशिरा म्हणजेच २५ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता. २०२२ मध्ये ११ जून, २०२१ला ९ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता. पण यावर्षी मुंबईत लवकर पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातून प्रवास करत १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. साधारणपणे १० जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात तो पोहोचतो. केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर साधारण सहा ते आठ दिवसांनी मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होतो. दरम्यान, हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, यंदा मोसमी पाऊस मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता अधिक आहे.

यंदा ‘अल निनो’चा प्रभाव नाही

यंदा मान्सूनच्या काळात ‘अल निनो’चा कोणताही प्रभाव असणार नाही. त्यामुळेच भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in