Mumbai : एक वर्षाच्या चिमुकल्याला आईने दिले जीवदान; यकृताचा काही भाग दिल्याने वाचले प्राण

अवघ्या सहा किलो वजनाच्या एक वर्षाच्या चिमुकल्यावर डॉक्टरांनी १० तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून यकृत प्रत्यारोपण यशस्वी केले.
Mumbai : एक वर्षाच्या चिमुकल्याला आईने दिले जीवदान; यकृताचा काही भाग दिल्याने वाचले प्राण
Mumbai : एक वर्षाच्या चिमुकल्याला आईने दिले जीवदान; यकृताचा काही भाग दिल्याने वाचले प्राणसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : अवघ्या सहा किलो वजनाच्या एक वर्षाच्या चिमुकल्यावर डॉक्टरांनी १० तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून यकृत प्रत्यारोपण यशस्वी केले. या चिमुकल्याचे प्राण वाचविण्यासाठी त्याच्या आईने स्वतःच्या यकृताचा काही भाग दान केला. जिवंत दात्याकडून यकृत प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. हा चिमुकला अलागिल सिंड्रोम या दुर्मीळ आनुवंशिक विकारामुळे यकृताच्या गंभीर आजाराने ग्रस्त होता. या विकाराचा परिणाम यकृतासह शरीरातील अनेक अवयवांवर होतो. त्यातच त्याला मूत्रपिंड आणि हृदयाशी संबंधित समस्या, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील बिघाड आणि तीव्र पोषणतूट अशा गुंतागुंतींचाही सामना करावा लागत होता.

जन्मानंतर काही काळातच त्याला सतत अंगाला खाज येणे आणि गडद रंगाची लघवी होणे अशी लक्षणे दिसू लागली. आठ महिन्यांचा होईपर्यंत खाज वाढली होती. त्याचे वजन अपेक्षेप्रमाणे वाढत नव्हते, तसेच पोटही फुगले होते.

वैद्यकीय तपासण्यांमध्ये रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढल्याचे, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाड झाल्याचे आणि यकृतावर गाठी व व्रण निर्माण होऊन ते खराब झाल्याचे निदर्शनास आले. यकृताची बायोप्सी तसेच संपूर्ण एक्सोम सिक्वेन्सिंगसह करण्यात आलेल्या आनुवंशिक चाचण्यांमधून त्याला अलागिल सिंड्रोम असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय त्याला रेनल ट्युब्युलर ॲसिडोसिस, फुफ्फुसांच्या धमन्यांमध्ये सौम्य अरुंदपणा आणि फुफ्फुसांतील रक्तदाब किंचित वाढल्याची समस्याही होती.

या सर्व गुंतागुंतींचा विचार करून यकृत प्रत्यारोपण आणि हेपॅटोबिलिअरी शस्त्रक्रिया विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. संजय कुमार गोजा आणि डॉ. अशोक थोरात यांच्या नेतृत्वाखालील बहुविशेषज्ञ डॉक्टरांच्या पथकाने प्रत्यारोपणाची तयारी केली. बालरोग गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, भूलतज्ज्ञ, अतिदक्षता आणि पोषणतज्ज्ञांचाही या पथकात समावेश होता.

शस्त्रक्रियेपूर्वी चिमुकल्याची पोषणस्थिती सुधारण्यासाठी त्याला अधिक कॅलरी आणि प्रथिनांचा आहार देण्यात आला. जीवनसत्त्वांची कमतरताही भरून काढण्यात आली. आनुवंशिक तपासणीत त्याच्या आईमध्ये संबंधित जेएजी१ जनुकातील दोष आढळला नाही. सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणीनंतर तिला यकृताचा काही भाग दान करण्यास परवानगी देण्यात आली.

अत्यंत कमी वजन, नाजूक रक्तवाहिन्या, रक्त गोठण्यातील अडचणी तसेच हृदय आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांमुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती.

नियमित तपासणीची आवश्यकता

हृदय आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांसाठी त्याला नियमित वैद्यकीय तपासणी आणि उपचारांची आवश्यकता राहणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लहान मुलांमध्ये दीर्घकाळ टिकणारी कावीळ, गडद रंगाची लघवी, सतत अंगाला खाज येणे आणि वजन न वाढणे ही गंभीर यकृतविकाराची पूर्वसूचक लक्षणे असू शकतात.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)