ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मुलाची आईकडून हत्या; जोगेश्‍वरीतील घटना

जखमी शिवकुमारला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मुलाची आईकडून हत्या; जोगेश्‍वरीतील घटना

मुंबई : ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मुलाची आईने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना जोगेश्‍वरी परिसरात उघडकीस आली आहे. मृत मुलाचे नाव शिवकुमार शीतलाप्रसाद दुबे असून, त्याच्या हत्येप्रकरणी बिंदू शीतलाप्रसाद दुबे हिला ओशिवरा पोलिसांनी अटक केली.

बिंदू ही मूळची उत्तरप्रदेशची रहिवाशी असून, ती जोगेश्‍वरीतील शुक्ला कंपाऊंडमध्ये तिचे दोन मुले शिवकुमार आणि अंबुजकुमार यांच्यासोबत राहते. तिचे पती शीतलाप्रसाद हे उत्तर प्रदेशात गावी राहतात, तर अंबुजकुमार हा एका खासगी कंपनीत कामाला आहे. शिवकुमार हा काहीच कामधंदा करत नसून, त्याला ड्रग्ज सेवन करण्याचे व्यसन लागले होते. अनेकदा तो ड्रग्जच्या आहारी घरी येत होता. त्यातून तिचे त्याच्यासोबत सतत खटके उडत होते. शनिवारी सायंकाळी शिवकुमार हा नेहमीप्रमाणे ड्रग्जच्या नशेत घरी आला होता. यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. रागाच्या भरात त्याने बिंदूला हँगरने मारहाण केली होती. त्यामुळे तिनेही घरातील चाकूने त्याच्यावर छातीवर वार केले होते. त्यात शिवकुमार हा गंभीररीत्या जखमी झाला होता. स्थानिकांकडून ही माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी शिवकुमारला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी बिंदूला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तिच्या चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in