
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायन येथे एका मूव्हर्स-अँड-पॅकर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घरातील सामान हलवताना ६.८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. सायन पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार श्रद्धा मेहता (वय ५५) आणि त्यांचे पती धर्मेश मेहता (वय ५८) हे २०२२ पासून सायनमधील दोस्ती एलिट या इमारतीत भाड्याने राहत होते. त्यांची मुले परदेशात काम करतात. अलीकडेच, त्यांचा भाडे करार संपल्याने, या दांपत्याने फ्लॅट सोडून धर्मेश यांच्या भावाच्या मालकीच्या तमिळ संगम रोडवरील शांती टॉवर येथील घरात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.
१५ ऑक्टोबर रोजी, श्रद्धा मेहता यांनी मूव्हर्स अँड पॅकर्स सेवा पुरवणाऱ्या प्रवीन पांडे नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्याने सामान पॅक करण्यासाठी काही बॉक्स पाठवले, ज्यात दांपत्याने आपले घरगुती सामान भरले. श्रद्धा आणि त्यांची घरकामवाली विद्या सावंत यांनी सोन्याचे दागिने एका ट्रॅव्हल बॅगेत ठेवले होते. त्याच दिवशी, पांडे आपल्या तीन सहकाऱ्यांसह आला आणि सर्व सामान नवीन ठिकाणी हलवले.
मात्र, १६ ऑक्टोबर रोजी सामान तपासताना, मेहता दांपत्याला ६.८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली ट्रॅव्हल बॅग गायब असल्याचे आढळले. पांडे याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्रद्धा यांनी सायन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३(५) आणि ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दोन महिन्यांत दुसरी घटना
मुंबईत मूव्हर्स अँड पॅकर्स कर्मचाऱ्यांशी संबंधित चोरीची ही दोन महिन्यांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी ३ सप्टेंबर रोजी वांद्रे येथील एका महिलेच्या घरातून लोणावळ्याला घरगुती वस्तू हलवताना एका लॉजिस्टिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी १६ लाख रुपयांचे दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. वांद्रे पोलिसांनी त्या प्रकरणात कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.