Mumbai : मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण; राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड १० मिनिटांत, महापौर, उपमहापौरांच्या हस्ते लोकार्पण

गोरेगाव (पश्चिम) येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यान मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार करण्‍यात आला आहे.
Mumbai : मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण; राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड १० मिनिटांत, महापौर, उपमहापौरांच्या हस्ते लोकार्पण
Mumbai : मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण; राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड १० मिनिटांत, महापौर, उपमहापौरांच्या हस्ते लोकार्पण(Photo-X/@mybmc)
Published on

मुंबई : गोरेगाव (पश्चिम) येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यान मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार करण्‍यात आला आहे. यामुळे राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान ३० मिनिटांचा प्रवास आता १० मिनिटांत करणे शक्य झाले आहे. प्रवासात वाचलेला अमूल्य वेळ मुंबईकरांना आपल्या कुटुंबासोबत देणे शक्य होईल. विस्तारीकरणासोबतच पुलाचा कायापालट झाला, याचेही समाधान आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले.

गोरेगावमधील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण पूर्ण होऊन हा टप्पा नागरिकांच्या सेवेत शनिवारी सायंकाळपासून खुला झाला. या विस्‍तारीत टप्प्याचे लोकार्पण मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्‍या हस्‍ते शनिवारी सकाळी करण्‍यात आले.

पुलाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करणारे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांचे महापौरांनी कौतुक केले. या विस्तारित टप्प्यामुळे प्रवासाचा वेळ कमी करणे शक्य झाले आहे. तसेच इंधनाची बचत शक्य होणार आहे. शहराच्या विकासात पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये रस्ते विकासाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे दळणवळण गतिमान होतानाच व्यापारासाठी हा विकास महत्त्वाचा असतो. येत्या काळात सिमेंट कॉंक्रिटीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होणार आहेत. पायाभूत सुविधा निर्माण केल्याने येत्या काळात हे प्रकल्प मुंबईकरांचा विश्वास वाढवण्यासाठी महत्वाचे ठरतील, असे उपमहापौर संजय घाडी यावेळी म्हणाले.

असा साकारला उड्डाणपूल

मृणालताई गोरे उड्‌डाणपुलाच्या विस्तारीकरणात वालभट नदीवरील वि‌द्यमान पूल पाडून पुनर्बांधणी करण्‍यात आली. तसेच, विद्यमान रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तार कामाशी एकत्रीकरण, अंदाजे ४५० मीटर लांबीच्या (२+२ मार्गिका) पोहोच मार्गाचे सुधारीकरण करण्‍यात आले आहे. विस्‍तारित पुलाची एकूण लांबी ७५० मीटर असून रुंदी १५.५० मीटर (२+२ मार्गिका) अशी आहे.

मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण
मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण(Photo-X)

वाहतूक कोंडी फुटणार

या विस्तारामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग (गोरेगाव पूर्व) ते रिलीफ रोड तसेच अंधेरी (पश्चिम) कडे जाणाऱ्या जोड रस्त्याला थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. तसेच स्वामी विवेकानंद मार्ग व परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. दाट लोकवस्ती, अत्यंत वर्दळीचे चौक, वाहतुकीची घनता यामुळे पोलीस वाहतूक परवानगी मिळविणे जिकीरीचे होते. मुख्य रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या उतारात बदल करण्याच्या स्थानिक रहिवाशांच्या विनंतीचा विचार करत ’जनरल ॲरेंजमेंट ड्रॉइंग’नुसार पुलाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात आली. त्यात संरेखन व लांबीचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in