

मुंबई : मुलुंड पूर्व येथे प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात येत असलेल्या इमारतींमध्ये काम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या लेबर कॅम्पला गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीच्या घटनेत एलपीजी गॅस सिलिंडरचे सहा ते सात स्फोटाने मुलुंड हादरले. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कॅम्पमध्ये राहणारे ३२३ कामगारांची सुखरुप सुटका करण्यात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुलुंड पूर्व टाटा नगर, नवघर रोड पूर्वा नगरच्या मागे शापूरजी पालोनजी कंपनीकडून बांधकाम कामगारांसाठी तळ अधिक दोन मजली तात्पुरता लेबर कॅम्प उभारण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी १ वाजून ५४ वाजण्याच्या सुमारास अग्नी भडका उडाला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यानंतर या घटनेत सहा ते सात एलपीजी सिलिंडरचे स्फोट झाल्याने आग आणखी भडकली.
या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी युद्धपातळीवर बचाव व आग विझविण्याचे काम सुरू केले. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीचा मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आला.
शापूरजी पालोनजी कन्स्ट्रक्शनचे प्रशासक निलेश खोत यांनी कॅम्पमध्ये राहणारे सर्व ३२३ कामगार सुरक्षित असल्याची माहिती दिली. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी डी. एम. पाटील यांनीही या माहितीला दुजोरा दिला.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई पोलिसांसह संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत आगीच्या कारणांचा तपास सुरू आहे.