बाधितांना नुकसानभरपाई देण्यास आयुक्तांचा हिरवा कंदील

कोस्टल रोड प्रकल्प; मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा
बाधितांना नुकसानभरपाई देण्यास आयुक्तांचा हिरवा कंदील

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पात बाधित मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. मत्स्य व्यवसाय आयुक्तांची मंजुरी मिळताच १,३४३ मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळणार असून, यासाठी १३६ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोस्टल रोड प्रकल्पात बाधित मच्छीमारांना ऑक्टोबर २०१८ पासून ते मे २०२४ पर्यंतची नुकसान भरपाई चार टप्प्यांत देण्यात येणार आहे. यासाठी १३६ कोटींची तरतूद करण्यात आली असून, पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांनी प्रस्तावास मंजुरी दिली आहे. आता मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा असून, बाधित मच्छीमार किती व नुकसान भरपाईसाठी किती मच्छीमार पात्र याची अंतिम यादी मत्स्य व्यवसाय आयुक्त अंतिम करतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाली; मात्र कोस्टल रोड प्रकल्पात मच्छीमारांचा रोजगार जाईल, अशी सूचना मच्छीमार संघटनांनी केली. यानंतर टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानंतर टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सने दिलेल्या अहवालानुसार, १,३४३ बाधितांना नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

अशी मिळणार नुकसान भरपाई

-टीआयएसएस’च्या सर्वेक्षणानुसार बोटीचा मालक, बोटीवर काम करणारे खलाशी, तांडेल, हाताने मासे-शिंपल्या निवडणारे, किनार्‍यावर जाळीने मच्छिमारी करणारे अशी कॅटेगरी बनवण्यात आली आहे.

- प्रत्येकाला ऑक्टोबर २०१८ पासून काम संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

- पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर २०१८ ते २०२२, दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत आणि त्यानंतर पुढील एक वर्षे व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित कालावधीतील रक्कम दिली जाणार आहे.

-विशेष म्हणजे, हाताने मासे निवडणारे, किनाऱ्यांवर जाळीने मच्छीमारी करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २०३०पर्यंत नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

८ टक्के व्याजही मिळणार!

कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाची सुरुवात ऑक्टोबर २०१८ मध्ये झाली. कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला आता ५ वर्षें होत आली आहेत. त्यामुळे बोटीचे मालक, चालक समुद्र किनारी मासळी पकडणारे अशा १,३४३ बाधितांना नुकसान भरपाई देण्यासह नुकसान भरपाई रकमेच्या तुलनेत ८ टक्के व्याज देण्यात येईल, असे ही अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in