सणासुदीच्या काळात पालिका अॅक्शन मोडमध्ये ; प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांवर छापे

एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांमुळे कारवाईला धार ; महिनाभरात १६०० किलो प्लास्टिक जप्त
सणासुदीच्या काळात पालिका अॅक्शन मोडमध्ये ; प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांवर छापे

मुंबई : प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास मुंबई महापालिकेने सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पालिकेचे अधिकारी व स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे प्रतिबंधीत प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून २१ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या महिनाभरात शॉपिंग मॉल, दुकाने, फेरीवाला आदी ठिकाणी छापे मारत तब्बल १,६४३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर दोन जणांना न्यायालयात खेचले असून ३७ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे १४ सप्टेंबर रोजी सांताक्रुझ येथे विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या छापेमारीत १९३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर विभागस्तरावर कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी सांगितले. प्रतिबंधित ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर आता तीव्र कारवाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. मात्र आता या कारवाईला वेग आला आहे. या कारवाईत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे २४ अधिकारी सहभागी असून २१ ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत शॉपिंग मॉल, फेरीवाल्यांची झाडाझडती घेण्यात आली.

२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास प्लास्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यानंतर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर २०१८ मध्ये बंदी घालण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली. मात्र २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि ही कारवाई थंडावली. २०२२ मध्ये कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. आता तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कारवाईत सहभागी झाल्याने कारवाईला वेग आल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in