
मुंबई : मुंबईत बरसणाऱ्या पावसामुळे पडझडीचे सत्र सुरू असून पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई महापालिकेच्या हद्दीत असलेल्या फुटपाथवरील पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज काढा, अशी नोटीस मुंबई महापालिकेने पश्चिम रेल्वे प्रशासनाला बजावली आहे.
दोन वर्षांपूर्वी पुण्यात जंक्शवर होर्डिंग्ज कोसळून ५ जण दगावले. मुंबईतही ४० बाय ४०, ३० बाय ४०, २० बाय ३० अशी फिक्स स्ट्रक्चर करून १,०५५ होर्डिंग्ज रस्त्यांवर, जंक्शनवर लावण्यात आली आहेत. मुंबईत होर्डिंग्ज लावण्यासाठी मुंबई महापालिकेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. लोअर परळ येथील सेनापती बापट मार्ग ते राखांगी चौक फिनिक्स मॉलसमोर पश्चिम रेल्वेच्या हद्दीत होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असून भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सेनपती बापट मार्ग ते राखांगी चौक फिनिक्स मॉलसमोरील रेल्वे हद्दीतील होर्डिंग्ज काढण्यात यावी, अशी नोटीस २१ जुलै २०२३ रोजी पालिकेच्या जी उत्तर विभागाने पश्चिम रेल्वेला बजावली आहे.
३० दिवसांची मुदत!
मुंबईच्या रस्त्यांवर, जंक्शनवर होर्डिंग्ज लावण्यासाठी वाहतूक विभागाची परवानगी, विमा संरक्षण, शुल्क भरले की नाही, याची माहिती घेण्यात येते. यापैकी काही त्रुटी आढळल्यास नोटीस बजावण्यात येते. नोटीस बजावल्यानंतर ३० दिवसांची मुदत देण्यात येते. त्यानंतर दुर्लक्ष केल्यास संबधिताचे लायसन्स रद्द करण्यात येते.