
शिंदे गटाच्या सहकार्याने भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर मुंबई महापालिकेतील वातावरण ढवळून निघत आहे.आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतल्या पालिका अधिकाऱ्यांची बदल करण्यात आली होती. मात्र १५ दिवसांत तीन अधिकाऱ्यांची पुन्हा दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आल्याने राज्यात सत्ता बदलानंतर मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांची भटकंती सुरु झाली आहे.
आर उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे, एन विभागाचे सहायक आयुक्त संजय सोनावणे आणि करनिर्धारण व संकलन विभागाचे विश्वास मोटे यांची बदली करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या आर-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांची बदली घाटकोपरच्या एन विभागात करण्यात आल्यानंतर अवघ्या १५ दिवसांमध्ये पुन्हा त्यांची बदली चेंबूर एम पश्चिम विभागात करण्यात आली आहे.
तर एन विभागाचे सहायक आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेल्या कार्यकारी अभियंता संजय सोनावणे यांच्याकडे पुन्हा त्याच विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पंधरवड्यातच झालेल्या बदलीने पालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत.