
कोरोना विरोधात लढा देत तब्बल २८२ अधिकारी व कर्मचारी शहीद झाले. कोरोना विरोधातील लढ्यात उपायुक्त ते सफाई कामगार शहीद झाले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी मुंबई महापालिकेने धाव घेतली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या योद्धांच्या कुटुंबीयांना आधार देत १६५ वारसांना सेवेत सामावून घेतले आहे. तर २१४ शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने २३ शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली आहे. दरम्यान, कोरोना काळात एकूण ७५९२ जणांना कोरोनाची लागण झाली होती.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा मार्च २०२० मध्ये मुंबईत शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाने थैमान घातले. कोरोना विषाणू काय याचा अनुभव कोणाकडे नसताना बाधित रुग्णांचा जीव वाचवणे याला पालिका प्रशासनाने प्राधान्य दिले. मुंबई महापालिकेतील प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी कोरोनाविरोधात रात्रंदिवस लढा देत होते. कोरोना विरोधात लढा देत असताना पालिकेतील उपायुक्त पदावर कार्यरत ते सफाई कामगार आदींना कोरोनाची लागण झाली. कोरोनाविरोधात लढा देत असताना २८२ अधिकारी व कर्मचारी शहीद झाले. कोरोना विरोधात लढा देत असताना शहीद झालेल्या योद्धांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरीत सामावून घेण्याचे पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. केंद्र सरकारने २३ शहिदांच्या कुटुंबीयांना मदत केली. परंतु मुंबई महापालिका प्रशासनाने शहीद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला. आतापर्यंत २३७ वारसांना आर्थिक मदत, तर १६५ वारसांना सेवेत सामावून घेतले आहे.
आरोग्य, घनकचरा विभागात सर्वाधिक मृत्यू
पालिकेच्या कोविड लढ्यात झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक म्हणजे ६३ मृत्यू घनकचरा विभागात झाले आहेत. तर आरोग्य खात्यात ४८ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. या मृतांमध्ये खातेप्रमुख २, करनिर्धारण व संकलन ७, अग्निशमन खाते १२, सुरक्षा खाते १४ आणि इतर विभागातील ११२ जणांचा समावेश आहे.