मुंबई महापालिकेच्या शाळा गजबजल्या

शाळेचा पहिला दिवस. त्यात नवीन प्रवेश घेतलेल्या लहानग्यांची रडारड, आईचा हात सोडून पळापळ अशा आनंदमयी वातावरणात मुंबई महापालिका शाळांत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत दस्तुरखुद्द पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी स्वागत केले.
मुंबई महापालिकेच्या शाळा गजबजल्या

मुंबई : शाळेचा पहिला दिवस. त्यात नवीन प्रवेश घेतलेल्या लहानग्यांची रडारड, आईचा हात सोडून पळापळ अशा आनंदमयी वातावरणात मुंबई महापालिका शाळांत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत दस्तुरखुद्द पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी स्वागत केले.

शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा, या उद्देशाने विशेष करून नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'प्रवेश पाडवा पहिले पाऊल' आयोजन करण्यात आले. वरळी सी-फेस येथील पालिका शाळेत आयोजित उपक्रमाचा शुभारंभ डॉ. भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, हा उपक्रम पुढील १५ दिवस राबवण्यात येणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप गगराणी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

वरळी सी-फेस शाळेतील अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रमांत इनोव्हेशन लॅब, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा आदी ठिकाणी गगराणी यांनी भेट दिली. प्रयोगशाळेत सुरू असणाऱ्या उपक्रमांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. तसेच शैक्षणिक संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी प्रयोगशाळेतील उपकरणांचा वापर हा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदतकारक ठरते का, याची विचारपूस केली. इनोव्हेशन लॅबच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या प्रयोगाची विद्यार्थी वर्गाला नावीन्यपूर्ण संकल्पना समजून घेण्यासाठी मदत होत आहे, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तर खगोलशास्त्र प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्रातील संकल्पना समजण्यास होणारी मदत, त्यातून अंतराळविषयक वाढणारी आवड, या क्षेत्राचा विद्यार्थ्यांचा कल त्यांनी जाणून घेतला.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (शिक्षण) चंदा जाधव, शिक्षण अधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदी यावेळी उपस्थित होते. तसेच वरळी सी-फेस शाळेच्या मुख्याध्यापिका (प्राथमिक) (इंग्रजी माध्यम) बागेश्री केरकर, मुख्याध्यापिका (प्राथमिक) (मराठी माध्यम) नीशा म्हात्रे, मुख्याध्यापिका (माध्यमिक) (इंग्रजी माध्यम) वैशाली कासारे, मुख्याध्यापिका (माध्यमिक) (मराठी माध्यम) अरविंद पवार हेदेखील उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा आवडीचा कल शोधणे, हे पहिले पाऊल उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांची आवड आणि कल लक्षात घेऊन गट तयार करण्यात येतात. गटातील विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना आवडीचे शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये शाळेची आवड निर्माण होणे, शिक्षणाची गोडी लागावी यादृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे; त्यासोबतच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पालक वर्गाचा सहभाग करून घेणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांची नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, गणनपूर्व तयारी, समुपदेशक कक्ष आदीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कल तपासण्यात येतो. पालकांसोबत विद्यार्थी विकास या उपक्रमात अपेक्षित आहे.

विद्यार्थ्यांसाठी 'प्रवेश पाडवा, पहिले पाऊल'

शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या दिवशी 'प्रवेश पाडवा' आयोजित करण्यात आला होता. शाळेत पहिल्यांदा प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे मन रमावे यासाठी विविध उपक्रम प्रवेश पाडवा अंतर्गत राबविण्यात येतात. दैनंदिन जीवनातील गोष्टी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाव्यात, हा उपक्रमाचा उद्देश आहे. खेळण्याच्या माध्यमातून वस्तू मोजणे, अभ्यासासोबतच खेळांचा वापर आदी विविध उपक्रम यात समाविष्ट आहेत. आजपासून पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी हा प्रवेश पाडवा उपक्रम सुरू राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in