

मुंबई : महापालिका सभागृहात नगरसेवकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सभागृहातच महापौर वैद्यकीय निधी कक्ष सुरू करण्यासह सभागृह सुरू असताना डॉक्टरांची उपस्थिती आणि सभागृहाबाहेर कायमस्वरूपी ॲॅम्ब्युलन्स तैनात ठेवण्याचे निर्देश त्यांनी सोमवारी प्रशासनाला दिले.
महापालिकेतील अनेक नगरसेवक ज्येष्ठ नागरिक असून त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आरोग्यविषयक समस्या आहेत. महासभेदरम्यान अचानक रक्तातील साखरेची पातळी कमी होणे किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे डॉक्टरांना वरच्या मजल्यावर न ठेवता सभागृहाच्या मागील बाजूस बसविण्याची व्यवस्था करावी. तसेच सध्या नगरसेवकांसाठी असलेल्या कँटीनच्या जागेत महापौर वैद्यकीय निधी कक्ष सुरू करण्यात यावा, अशी सूचना महापौरांनी केली.
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना सभागृहात चक्कर आल्याच्या घटनेनंतर सभागृहातील आरोग्य सुविधांचा मुद्दा चर्चेत आला.