
प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याबरोबरच बस थांबेही आकर्षक करण्यावर मुंबई महापालिकेने जोर दिला आहे. दक्षिण मुंबईत पारदर्शक, हिरवळ बसथांब्यांना प्रतिसाद मिळाल्यानंतर आता उपनगरातील बसथांब्यांचा कायापालट होणार आहे. पारदर्शक, हिरवळ व पर्यावरणपूरक २००हून अधिक बसथांब्यांचा कायापालट होणार असून, यासाठी मुंबई महापालिका जिल्हा नियोजन विकासनिधीतून १८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
आधुनिक पद्धतीचे बांधकाम आणि पर्यावरणाचा समतोल राखून दक्षिण मुंबईत बांधण्यात आलेल्या बेस्टच्या थांब्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने महापालिका शहर पूर्व, पश्चिम उपनगरांतील तब्बल २०० बसथांब्यांचा चेहरा बदलणार आहे. पालिकेच्या नियोजन विभागातर्फे हे काम केले जाणार असून, त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या कामासाठी तब्बल १७ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
दक्षिण मुंबईतील हेरिटेज वास्तू लक्षात घेता पालिकेने रिगल सिनेमागृह, छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, मुंबई विद्यापीठ, श्यामप्रसाद मुखर्जी चौक येथील पदपथाचे सुशोभीकरण नुकतेच पूर्ण केले. या सुशोभीकरणांतर्गत पालिकेने पदपथावरील बेस्टच्या बसथांब्याचे रूपडे पालटले आहे. एकूण ११ पैकी नऊ बसथांब्यांना पारदर्शक काचांचा साज देण्यात आला आहे. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओ भागातही एका थांब्यांचे नूतनीकरण केले आहे.
‘या’ बसथांब्यांचा होणार कायापालट
पहिल्या टप्प्यात ओशिवरा येथे १५, गोवंडी १३, देवनार ११, तर गोरेगाव येथे १० असे सर्वाधिक बसथांबे बदलण्यात येणार आहेत. तर कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, सांताक्रूझ, मागाठाणे, वांद्रे, गोराई, पोयसर मालाड, मालवणी येथील बस थांबे बदलण्यात येणार आहेत.