प्रशिक्षण केंद्र कांदिवलीत, ग्रंथालय मात्र वरळीत; मुंबई महापालिकेचा अजब कारभार

पालिकेच्या विविध खात्यांधील हजारो कर्मचाऱ्यांना कांदिवली येथे प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षण केंद्र कांदिवलीत, ग्रंथालय मात्र वरळीत; मुंबई महापालिकेचा अजब कारभार
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : पालिकेच्या विविध खात्यांधील हजारो कर्मचाऱ्यांना कांदिवली येथे प्रशिक्षण दिले जाते. यानुसार प्रशिक्षणार्थींसाठी असलेले पालिकेचे ग्रंथालय वाचकांची गैरसोय होत असल्याकारणाने वरळी येथे हलवण्याच्या विचारात पालिका आहे.

प्रशिक्षण केंद्र एकीकडे आणि ग्रंथालय दुसरीकडे अशा पालिकेच्या या अजब निर्णयाविरोधात कर्मचारी संघटना आणि मराठी एकीकरण समितीने आवाज उठवला. यांनतर पालिकेने मनात येईल ते उत्तर देत या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. १९८५ सालापासून सुरू असलेले ग्रंथालय केवळ १५ वर्षापासून सुरू असल्याचे पालिकेने म्हटले आहे. मात्र, संबधित बाब पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अनावधानाने उल्लेख झाल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले. परंतु, वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठीच वरळी येथे ग्रंथालय हलवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे. कांदिवली येथे १९८५ साली महापालिकेने १३ एकर जागेत नागरी प्रशिक्षण संस्था आणि संशोधन केंद्राची स्थापना केली.

या प्रशिक्षण संस्थेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थींना सखोल अभ्यास करता यावा आणि पालिकेच्या विविध नियमांची तसेच अन्य बाबींची माहिती व्हावी यासाठी सुसज्ज असे ग्रंथालय या ठिकाणी तयार करण्यात आले. या ग्रंथालयात सद्यस्थितीत ६ हजार पुस्तके असून हे ग्रंथालय १३०० चौरस फुटाच्या जागेत सुरू आहे. मात्र कोणत्याही प्रशिक्षणार्थीची मागणी नसताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे ग्रंथालय वरळी येथे नेण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे प्रशिक्षण केंद्र एकीकडे आणि ग्रंथालय दुसरीकडे करण्याचा अजब विचार पालिका अधिकारी करत आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना संदर्भ ग्रंथ मिळणार नाहीत, असा दावा मराठी एकीकरण समिती आणि म्युन्सिपल युनियनने केला आहे.

या ठिकाणी असलेल्या ग्रंथालयात पुस्तके प्रशिक्षणाच्या दिवशी घेऊन गेल्यानंतर पुस्तकांची देवाणघेवाण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अडचणीचे ठरत आहे.

मूळ उद्देशालाच हरताळ 

अविघ्न कंत्राटदार यांच्याकडून २०२२ साली या ग्रंथालयाच्या रंगरंगोटीचे काम करण्यात आले. सद्यस्थितीत असलेली इमारत चांगली असतानाही केवळ अट्टाहासापोटी ग्रंथालय ४५० चौरस फुटाच्या छोट्याशा जागेत हलवण्याच्या विचारात पालिका आहे. त्यामुळे ग्रंथालयाचा प्रशिक्षणार्थींसाठी असलेल्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार आहे. त्यामुळे पालिकेने ग्रंथालय स्थलांतरित करू  नये अशी मागणी म्युनिसिपल युनियनने केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in