
मुंबई : तीन वर्षापूर्वी ९१ हजार कोटींवर मुदत ठेवी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी आता ७९ हजार ४९८ कोटींवर आल्या आहेत. या मुदतठेवी १२ हजार १९२ कोटीनी घटल्या आहेत, अशी माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत आणि नावाजलेली महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदतठेवींमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. मुंबई महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या बँकामधून मुदतठेवींवरून सद्यस्थितीचा अंदाज बांधता येतो. तर पालिकेच्या या मुदत ठेवीमधूनच पालिकेचा कारभार हाकला जातो. तर, कर्मचाऱ्यांची देणी देण्यात येतात. मुंबई क्षेत्रात सुरू असलेल्या विकासकामांसाठी याच मुदत ठेवींचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये रस्त्यांची काँक्रीटीकरणाची कामे, रस्ते, पूल, वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्ग आणि दहिसर – भाईंदर जोड रस्ता, गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता अशा प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी पालिकेला दोन ते अडीच लाख कोटींचे देणी देणे आहे.
मुंबई क्षेत्रात तीन वर्षपूर्वी बांधकाम व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. त्यातून मुंबई महापालिकेला १४ हजार ७५० कोटींचा फायदा झाला. पालिकेच्या तिजोरीत भर पडली.