प्रतिनिधी/मुंबई
मुंबई महापालिकेच्या ९२ हजार कोटींच्या मुदत ठेवींमध्ये तब्बल सहा हजार कोटींची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा हा पैसा कुणाच्या घशात गेला आणि या ठेवींवर कुणी डल्ला मारला? असा सवाल मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी बुधवारी येथे केला. सध्या मुंबई महापालिकेवर राज्य सरकारने प्रशासक नेमले असून त्यांच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सुशोभीकरण आणि जाहिरातबाजी यावर ही उधळपट्टी केल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबई काँग्रेसने केला. याप्रकरणी शिंदे सरकारने स्पष्टीकरण द्यावे अन्यथा मुंबईत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला.
सन २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ या वर्षात पालिकेच्या मुदत ठेवी ९२ हजार कोटींवरून ८६ हजार कोटींवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना मुदत ठेवी घटल्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असताना या स्थितीत महापालिकेच्या मुदत ठेवींना हात लावण्याची गरजच काय? असा सवाल करत हा पैसा बेफाम पध्दतीने जाहिरातबाजीवर खर्च केला जात असून हा महापालिकेच्या निधीचा अपव्यय असल्याची टीका गायकवाड यांनी केली.
मुंबई महापालिकेची मुदत संपल्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. निवडणुका न घेता लोकशाही मार्ग नाकारून राज्य सरकारकारची जणू हुकूमशाही सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांच्या खर्चात वाढ होते आहे. प्रकल्पांच्या किमतीत फेरफार करणारे प्रस्ताव प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवले जात आहेत. पालिकेत निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे या खर्च वाढीवर कोणतीही चर्चा न होता हे प्रस्ताव गोपनीय पद्धतीने मंजूर केले जात आहेत. या प्रस्तावांमध्ये खर्च वाढीची कारणे दिलेली असली तरी कोट्यवधींचा फेरफार आणि वारंवार येणारे प्रस्ताव यामुळे या सगळ्या खर्चाविषयी संशयाचे वातावरण आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या. राज्य सरकारच्या सोयीने मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये हजारो कोटींची घट होत आहे. यात नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. हा जनतेचा पैसा असून त्यावर कुणी डल्ला मारत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून याचा जाब विचारला जाईल, असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिला.