
पावसाळ्यात झाड उन्मळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईतील तब्बल ८,५०६ खाजगी व सरकारी कार्यालयांना नोटीसा बजावल्या आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करून घ्या, असे निर्देश दिल्याचे उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेच्या अखत्यारित एकूण २९ लाख ७५ हजार २८३ तर खासगी जागांमध्ये सुमारे १५ लाख ५१ हजार १३२ झाडे आहेत.
अतिवृष्टी आणि वादळी पावसात झाडांच्या फांद्या किंवा धोकादायक झाड कोसळून जीवित-वित्तहानी होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यावर्षी पालिकेने या कामात आतापर्यंत ४९ हजार १६७ झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली आहे. तसेच वाढ झालेल्या फांद्या, मृत झाडे रस्त्यावरून हटवण्याचे कामे सुरू असल्याचे परदेशी यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत खासगी सोसायट्यांचा परिसरत १०० ते काही ठिकाणी २०० हून जास्त झाडे असतात. त्यामुळे खासगी सोसायट्या, विविध आस्थापनांनी आपल्या परिसरातील झाडांच्या धोकादायक फांद्या पावसाळ्याआधी छाटून घ्याव्यात असे आवाहनही पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.