

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आरक्षण सोडत मंगळवारी वांद्रे येथील बालगंधर्व सभागृहात काढण्यात आली. या सोडतीसाठी विविध पक्षांचे माजी नगरसेवक, इच्छुक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभागृहात जमले होते. आरक्षण जाहीर होताच नेत्यांचे कार्यकर्ते जल्लोष करत होते. तर ज्यांच्या प्रभागांचे आरक्षण बदलले त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा पसरला होता.
राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीचे अर्ज भरण्याची लगबग सुरू असतानाच मंगळवारी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीसाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या आरक्षण सोडतीमुळे अनेकांची प्रतीक्षा संपली आहे. ज्यांचे आरक्षण कायम राहिले ते इच्छुक आणि माजी नगरसेवक तिकीट मिळवण्याच्या कामाला लागणार आहेत, तर ज्यांच्या प्रभागांचे आरक्षण बदलले ते पर्यायी प्रभागांच्या शोधात आहेत. तसेच ज्यांचे प्रभाग महिला वॉर्ड झाले त्याठिकाणी पत्नी किंवा मुलीला मैदानात उतरण्याची तयारी सुरू होणार आहे.
ज्यांना पक्षातून उमेदवारी मिळणार नाही, अशा इच्छुकांना दुसऱ्या पक्षात प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यामुळे अशांनी दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळविण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे.
आकडेवारी
मुंबईची एकूण लोकसंख्या : १ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३
अनुसूचित जातींची लोकसंख्या : ८ लाख ३ हजार २३६
अनुसूचित जमातींची लोकसंख्या : १ लाख २९ हजार ६५३
प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या सरासरी : ५२ हजार ७२२
नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार
काही माजी नगरसेवक यावेळीही उत्सुक आहेत, मात्र आरक्षणात वॉर्ड गेल्याने त्यांच्या जागेवर आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. महिला आरक्षण झाल्याने मुलीला, सुनेला की पत्नीला रणांगणात उतरवणार? हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.
पालिकेचे ५ नगरसेवक झाले आमदार
मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत जे नगरसेवक पदावर निवडून आले, त्यापैकी दिलीप लांडे (वार्ड क्रमांक १६३) हे आमदार झाले. तसेच, अनंत (बाळा) नर (वार्ड क्रमांक ७७), रमेश कोरगावकर (वार्ड क्रमांक १४४) हे तिघेजण आमदार झाले. तर, भाजपचे मुरजी पटेल (वार्ड क्रमांक ८१, नंतर त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले होते. मात्र ते पुढे आमदार झाले. तसेच समाजवादी पक्षाचे रईस शेख (वार्ड क्रमांक २११) हे देखील आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या असल्याने त्यांच्या जागेवर त्या-त्या पक्षातील इतर इच्छुकांना लॉटरी लागणार आहे.
५ माजी नगरसेवकांच्या निधनामुळे इतरांना संधी
मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत जे २२७ नगरसेवक निवडून आले होते, त्यापैकी भाजपचे सुनील यादव (वार्ड क्रमांक ८०), भाजपचे माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौर डॉ. राम बारोट (वॉर्ड क्रमांक ४५), शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना ठाकरे गटाचे शाहिदा हारून खान आणि भाजपच्या रजनी केणी यांचे निधन झाले आहे. तर या सर्वांच्या निधनामुळे पाच जागा रिक्त झाल्या असून त्या जागांवर त्या-त्या राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार किंवा त्यांचे कुटंबीय निवडणुकीसाठी दावा करण्याची शक्यता आहे.
१४ ते २० नोव्हेंबरपर्यंत हरकती, सूचना नोंदवता येणार
मुंबईतील ६१ वॉर्ड ओबीसींसाठी राखीव झाले आहेत. त्यात ३१ महिला ओबीसी उमेदवारांचा समावेश असेल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. ते म्हणाले, “१४ ते २० नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आरक्षण प्रारूपावर हरकती व सूचना सादर करता येतील. या हरकती व सूचनांवर विचार केल्यानंतर आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.”