आठवडाभरात मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार; २४ वॉर्डांत निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती; आयुक्तांची माहिती

मुंबई महानगरपालिका निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याचे संकेत असून, प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. २४ वॉर्डांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
आठवडाभरात मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार; २४ वॉर्डांत निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती; आयुक्तांची माहिती
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची घोषणा येत्या आठवड्यात कधीही होईल, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने निवडणुकीसंदर्भात योग्य ती तयारी केली असून निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २४ वॉर्डांत निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला आणि ८ मार्च २०२२ पासून मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय राज्य आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे निवडणूक पुढे ढकलत गेली आणि आता तब्बल साडेतीन वर्षांनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यातच येत्या आठवड्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपलिका निवडणुकांच्या मतदानासबंधी व अनुषंगिक कामासाठीचे अधिकार महानगरपलिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. मुंबईत २४ वॉर्ड असून २२७ प्रभाग आहेत. मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक निर्णय अधिकारी- सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे गगराणी यांनी सांगितले. पालिका यंत्रणा कामाला लागल्यामुळे आता लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in