
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. या सुधारित प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार असून नगरविकास खाते आणि निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईच्या पुनर्रचना केलेल्या प्रभागांचे नकाशे येत्या २८ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर २०२५ दरम्यान प्रसिद्ध करून जनता आणि पर्यायाने राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून हरकती आणि सूचना मागवल्या जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
मुंबईतील २२७ प्रभागांची प्रारुप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाची मान्यता महापालिका आयुक्त घेतील आणि या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयुक्त हे मान्यता देणार आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेने ०५ ऑगस्ट रोजी पुनर्रचना केलेल्या प्रभागांची यादी ही नकाशांसह नगरविकास खाते आणि निवडणूक विभागाला सादर केली होती. आता दोन्हींकडून या पुनर्रचना केलेल्या प्रभागांकरिता येत्या १८ ऑगस्ट रोजी महापालिकेला याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर २२ ऑगस्ट रोजी याबाबत प्रभागांची रचना प्रसिद्धीला दिली जाणार आहे. त्यानंतर नागरिकांना आपल्या प्रभागांच्या रचनेबाबत हरकती तथा सूचना नोंदवायची असल्यास त्यांना २८ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर या कालवधीमध्ये संधी दिली जाणार आहे. या हरकती व सूचनांचे निवारण महापालिका आयुक्तांच्या स्तरावर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.