
पूनम पोळ/ मुंबई
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेच्या मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या सुरक्षारक्षक विभागात प्रचंड असंतोष पसरला आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे महिला सुरक्षारक्षककर्मींसह पुरुष सुरक्षारक्षकही त्रासले आहेत. यामुळे पालिकेच्या सुरक्षारक्षक विभागात ‘तुघलकी कारभार’ सुरू असल्याचे समोर आले आहे.
मुंबई महापालिकेच्या सुरक्षारक्षक विभागात कर्मचाऱ्यांमध्ये मागील वर्षभरापासून प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार त्यास कारणीभूत ठरत असल्याचा आरोप म्युन्सिपल मजदूर युनियनच्या वतीने करण्यात येत आहे. सुरक्षारक्षक, महिला सुरक्षारक्षकांची छायाचित्रे काढणे, लहानसहान चुकांसाठी दंडात्मक कारवाई करणे, घरापासून दूरवर बदली करणे, महिला कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार असल्याचे सांगून रात्रपाळी लावणे, यामुळे या विभागातील कर्मचारी हे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळले आहेत.
तर, सीसीटीव्हीच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्षात सुरक्षा अधिकारी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची स्वतःच्या वैयक्तिक मोबाईलवरून छायाचित्रे काढत असून कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असल्याचे आरोप काही सुरक्षारक्षकांनी केले. तसेच, सुरक्षारक्षक विश्रांतीगृहात बसले असता त्यांचे फोटो काढून त्यांना जाणूनबुजून त्रास देत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी अनेक सुरक्षारक्षकांनी आयुक्तांच्या दरबारी जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, अधिकाऱ्यांकडून या प्रयत्नावर दरवेळी पाणी टाकण्यात आले. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर उपायुक्त अजितकुमार आंबी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळालेला नाही.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर
फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे पायात मोजे घातले नसल्याने दंड आकारण्यात आला असल्याची माहिती पुरुष सुरक्षारक्षकांनी दिली. तसेच, सीसीटीव्ही फुटेज पाहणारे कर्मचारी हे सतत आमच्यावर नजर ठेवून असतात. त्यामुळे घरातून आलेला महत्त्वाचा फोन घेणेही शक्य होत नसल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले.
दंड आकारण्याची भीती
मासिक पाळीदरम्यान शौचालयात ५ ते १० मिनिटे उशीर झाला तरी दंड आकारण्याची भीती दाखवली जाते. तसेच, या काळात शारीरिक वेदना होत असताना खुर्ची बाहेर लांब करून बसल्यास १० हजारांचा दंड आकारला जाईल, असे वरिष्ठांकडून सांगण्यात येते. तसेच, रात्रपाळी केली नाही तर पगारवाढ होणार नाही, असे सांगितले जात असल्याची माहिती एका महिला सुरक्षारक्षककर्मीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.