Mumbai : एमयूटीपी प्रकल्पांसाठी १७७७ कोटींचा निधी; उपनगरिय रेल्वेला मिळणार चालना

निधी गेल्या वर्षीच्या ७८९ कोटींच्या तुलनेत १२५ टक्क्याने वाढला. मुंबई महानगर क्षेत्रातील विविध उपनगरीय रेल्वे प्रकल्पांना चालना मिळणार.
Mumbai : एमयूटीपी प्रकल्पांसाठी १७७७ कोटींचा निधी; उपनगरिय रेल्वेला मिळणार चालना
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईतील सर्वात जास्त भार लोकल सेवेवर आहे. या लोकल सेवेतून रोज ८० लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबईकरांची गरज लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई शहरी परिवहन प्रकल्पांसाठी (एमयूटीपी) १,७७७कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी गेल्या वर्षीच्या ७८९ कोटींच्या तुलनेत १२५ टक्क्याने वाढलेला आहे. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील विविध उपनगरीय रेल्वे प्रकल्पांना चालना मिळणार आहे.

मुंबई महानगरातील प्रवाशांचा प्रवास सुखद व वेगवान करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमार्फत मुंबई शहरी परिवहन प्रकल्पामार्फत विविध रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करण्यात येते. त्यानुसार या प्रकल्पांना गती मिळते. चालू आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात एमयूटीपी प्रकल्पांसाठी १,७७७ कोटींचा निधी उपनगरीय प्रकल्प मार्गी लावण्यासाठी देण्यात आला आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (टप्पा-२) १०० कोटी, मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (टप्पा-३) ८०० कोटी आणि मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (टप्पा-३/अ) ८७७ कोटी अशी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकार तितकीच रक्कम प्रदान करणार आहे. यामुळे एकूण निधीचा पुरवठा दुप्पट होणार आहे.

या निधीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण एमयूटीपी प्रकल्पांना गती मिळणार असून यामुळे महानगरातील कनेक्टिव्हिटी सुधारून प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत. भक्कम आर्थिक पाठबळामुळे नवीन कॉरिडॉर, स्टेशन उन्नतीकरण आणि सुधारित रेल्वे पायाभूत सुविधा यांसह महत्त्वपूर्ण एमयुटीपी प्रकल्प वेगात प्रगती करत आहेत. यामुळे मुंबईतील प्रवाशांना अधिक जलद, सुरक्षित व कार्यक्षम उपनगरीय रेल्वे नेटवर्क मिळण्याकडे मोठे पाऊल उचलले गेले आहे, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in