
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत रुग्णालय आणि दंत वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयात अधिक क्षमतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याकरिता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि भारतीय दंत वैद्यकीय परिषद यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी या पदवी अभ्यासक्रमासाठी अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे महापालिकेला शक्य होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
नायर दंत रुग्णालय व दंत वैद्यकीय महाविद्यालयाला बीडीएस पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्येतील क्षमता वृद्धीस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत दंत वैद्यकीय शाखेकडून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या ६७ वरून ७५ झाली आहे. भारतीय दंत वैद्यकीय परिषद यांच्याकडूनही या मान्यतेसाठी शिफारस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या वाढीव जागांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल श्रेणीअंतर्गत सन २०१७ मध्ये ६०-६७ आणि नंतर ६७-७५ विद्यार्थी संख्येतील वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. या वाढीसाठी मान्यता प्राप्त झाली आहे.
या विद्यार्थी क्षमतावाढ मान्यतेसाठी एकूण चार वर्षांचा कालावधी लागला आहे. या कालावधीत भारतीय दंत वैद्यकीय परिषद व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यातर्फे आकस्मिक भेटी व पाहणी दौरे घेण्यात आले. २०२५ मध्ये ७५ विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या बॅचमधून उत्तीर्ण झाल्यानंतर आता मान्यता मिळाली आहे आणि भारत सरकारकडून मान्यता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, अशी माहिती पालिकेने दिली.
“बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी या पदवी अभ्यासक्रमांतर्गत एकूण ७५ विद्यार्थ्यांची तुकडी यंदा उत्तीर्ण झाली आहे. विद्यार्थी क्षमतेची मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेत रुग्णालयातील पायाभूत सुविधा विकास, मनुष्यबळातील वाढ आणि रुग्णसेवांमध्ये करण्यात आलेली सुधारणा यांचा समावेश आहे. वाढत्या रुग्णभाराच्या पार्श्वभूमीवर पदवी अभ्यासक्रमामध्ये अधिक विद्यार्थीसंख्येसाठी मान्यता प्राप्त होणे ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात विद्यार्थी संख्या १०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने पायाभूत सुविधांमध्ये वाढ तसेच मनुष्यबळाचा समावेश करण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. - डॉ. नीलम अंद्राडे, अधिष्ठाता, नायर रुग्णालय व दंत महाविद्यालय