

मुंबई : नायर रुग्णालयातील परिचारिकांना दोन वेळचे जेवण, नाश्ता दिला जातो. परंतु निवासी परिचारिकांना शिजविलेले अन्नपदार्थ खाण्यास देण्यापूर्वी अधिसेविका कार्यालयामार्फत अन्नपदार्थाचा नमुना व गुणवत्ता तपासली जाते. त्यानंतरच परिचारिकांना जेवण व नाश्ता हा चांगल्या दर्जाचाच पुरविला जातो, अशी माहिती नायर रुग्णालयाने दिली आहे. या संदर्भात गेल्या आठवड्यात पालिकेत प्रश्न उपस्थित केला होता.
नायर धर्मादाय रुग्णालयात रोज अंदाजित ३०० निवासी शिकाऊ परिचारिकांना चहा, अल्पोपहार, २ वेळचे जेवण दिले जाते. तसेच ८१६ अनिवासी परिचारिकांना कर्तव्यावर असताना चहा दिला जातो. यासाठी प्रक्रियेद्वारे उपहारगृहाचे कंत्राट दिले जाते. कंत्राटदारास माफक दरात वीज, पाणी व जागेचे भाडे आकारले जाते. मुंबई महापालिका प्रशासनाकडून अधिदानाची खात्री असते, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
पालिकेने नेमलेल्या कंत्राटदारांनी शिजवलेले अन्न, पेये तसेच कच्चा माल इत्यादींचे आवश्यक असेल तेव्हा नमुने विश्लेषणासाठी घेतले जातात. अन्न, पेय इत्यादी प्रत्येक वस्तूची गुणवत्ता, योग्य तयारी व चव इत्यादींबाबत अधिकृत अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते.