नर्दुल्ला टँक मैदानावरून रण पेटणार; पार्किंगसाठी मुंबई मनपा ठाम, स्थानिकांचा जोरदार विरोध

स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध, मोर्चे आणि आंदोलनांनंतरही प्रभादेवीतील नर्दुल्ला टँक मैदानात भूमिगत पार्किंग उभारण्याच्या प्रस्तावावर मुंबई महापालिका ठाम आहे.
नर्दुल्ला टँक मैदानावरून रण पेटणार; पार्किंगसाठी मुंबई मनपा ठाम, स्थानिकांचा जोरदार विरोध
नर्दुल्ला टँक मैदानावरून रण पेटणार; पार्किंगसाठी मुंबई मनपा ठाम, स्थानिकांचा जोरदार विरोध
Published on: 

मुंबई : स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध, मोर्चे आणि आंदोलनांनंतरही प्रभादेवीतील नर्दुल्ला टँक मैदानात भूमिगत पार्किंग उभारण्याच्या प्रस्तावावर मुंबई महापालिका ठाम आहे. मैदान आता पालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर पार्किंगच्या कामाला गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.१२४ वाहनांची क्षमता असलेले भूमिगत वाहनतळ उभारण्याचे नियोजन असून, त्यामुळे मैदान वाचविण्यासाठी लढा देणाऱ्या स्थानिक नागरिकांचा विरोध पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे.

केवळ २,६०१ चौरस मीटर जागेचा वापर

मैदानाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १६ हजार चौरस मीटर आहे. त्यापैकी प्रत्यक्ष भूमिगत पार्किंगसाठी १,१०० चौरस मीटर जागा वापरण्यात येणार आहे. बांधकामाच्या काळात साहित्य ठेवणे आणि अन्य कामांसाठी एकूण २,६०१ चौरस मीटर जागेची आवश्यकता भासणार आहे. पार्किंगचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे १४ हजार ९०० चौरस मीटर जागा खेळण्यासाठी उपलब्ध राहील, असा दावा पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. या भूमिगत वाहनतळात १२० चारचाकी वाहने आणि चार बस अशा एकूण १२४ वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असेल. मात्र, दुचाकी वाहनांसाठी कोणतीही सुविधा प्रस्तावित नाही.

सिद्धिविनायक सुशोभिकरणात पार्किंग!

सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत या भूमिगत पार्किंगची योजना आखली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ७८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मंदिराच्या दोन्ही मार्गांवर भव्य प्रवेशद्वारे, अत्याधुनिक स्वच्छतागृहे, गर्भवती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शनरांगेत बसण्याची तात्पुरती व्यवस्था, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि वाहनतळ अशा विविध कामांचा समावेश आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)