

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या ३५ किमी लांबीच्या मेट्रो-८ मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय ६६ किलोमीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत समितीची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती फडणवीस यांनी दिली. पायाभूत सुविधा प्रकल्पाला आवश्यक असलेले भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. तसेच कुठलाही पायाभूत सुविधा प्रकल्प भूसंपादनानंतर पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सोबतच समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर - गोंदिया, भंडारा - गडचिरोली महामार्ग कामास गती द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
सुमारे २२ हजार ८६२ कोटी रुपये खर्चाच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रस्तावित मेट्रो मार्गाची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून यापैकी भूमिगत मार्ग ९.२५ किलोमीटर तर उन्नत मार्ग २४. ६३६ किमी असणार आहे. या मार्गावर एकूण २० स्थानके असणार असून त्यात सहा स्थानके भूमिगत असतील. या प्रकल्पासाठी ३०.७ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता असून भूसंपादनासाठी ३८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
२०२७ मधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात परिक्रमा मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. या मार्गाची एकूण लांबी ६६.१५ किलोमीटर असून या प्रकल्पासाठी येणाऱ्या एकूण ३ हजार ९५४ कोटीच्या खर्चास आज पायाभूत समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून ५० टक्के भूसंपादन झाल्यास कार्यादेश देण्याचा निर्णय बैठकीत झाल्याचे फडणवीस म्हणाले.
या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे - कोनसरी - मूळचेरा - हेदरी - सुरजागड महामार्गाच्या सुधारित ८५. ७६ किलोमीटर लांबीच्या मार्गाला मान्यता देण्यात आली असून हा महामार्ग चार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा असणार आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल गायकवाड, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
मेट्रो मार्गाची एकूण लांबी ३५ किलोमीटर
भूमिगत मार्ग ९.२५ किलोमीटर, उन्नत मार्ग २४.६३६ किमी
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-२ स्थानक ते घाटकोपर पूर्वपर्यंत भूमिगत स्थानके
घाटकोपर पश्चिम स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानकापर्यंत उन्नत स्थानके
प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण २२,८६२ कोटींचा खर्च अपेक्षित.