

मुंबई: कफ परेडच्या नेव्ही नगरमधील राहत्या घरी १५ ऑगस्टच्या संध्याकाळी एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
पूरणमल शंभूलाल मेहरा (३०), त्यांची पत्नी ओमा पूरणमल मेहरा (२८), त्यांचा तीन वर्षांचा मुलगा यश पूरणमल मेहरा आणि दोन महिन्यांचे बाळ अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. परंतु पोलिसांना काही औषधे सापडली आहेत, ज्यांची डॉक्टरांकडून पडताळणी केली जाईल. पूरणमल हे मानसिक तणावाखाली होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते, असा संशय पोलिसांना आहे.
कफ परेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलात खलाशी असलेले पूरणमल हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांची पत्नी आणि दोन मुले बेडवर मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या मृत्यूंमागच्या परिस्थितीचा तपास करत आहेत.
चारही मृतदेह जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासावरून पूरणमल यांनी आत्महत्या केली असावी, तर त्यांची पत्नी आणि मुलांचा विषारी पदार्थ प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचा संशय आहे. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरणमल आणि ओमा यांच्यात आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये वाद असल्याचे समजते. या दांपत्याच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली होती. या कौटुंबिक वादाचा या मृत्यूंशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
१५ ऑगस्ट रोजी पूरणमल यांच्या वडिलांनी त्यांच्याशी फोनवरून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी नौदलाच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी कुटुंबाची चौकशी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता घरातील चारही सदस्य मृतावस्थेत आढळले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
ही घटना सामूहिक आत्महत्या आहे की हत्या करून केलेली आत्महत्या याचाही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासात भारतीय नौदल शक्य ते सर्व सहकार्य करत असल्याचे संरक्षण प्रवक्त्याने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. या घटनेची भारतीय नौदलाने अंतर्गत चौकशीही सुरू केली असल्याचे एका सूत्राने सांगितले.